Nithari killings | निठारी हत्याकांडातील आरोपी सुरिंदर कोळी, पंढेर निर्दोष, फाशीची शिक्षा रद्द

Nithari killings | निठारी हत्याकांडातील आरोपी सुरिंदर कोळी, पंढेर निर्दोष, फाशीची शिक्षा रद्द

पुढारी ऑनलाईन : अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी निठारी हत्याकांडातील दोन प्रमुख आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने आरोपी सुरिंदर कोळी (Surinder Koli)  याला त्याच्याविरुद्धच्या १२ खटल्यांमध्ये निर्दोष ठरवले, तर सहआरोपी असलेल्या मोनिंदर सिंह पंढेर (Moninder Singh Pandher) याची त्याच्याविरुद्धच्या दोन खटल्यांमधून निर्दोष मुक्तता केली.

संबंधित बातम्या 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोनिंदर सिंह पंढेर याला त्याच्याविरुद्धच्या दोन प्रकरणांत निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्याविरुद्ध एकूण ६ खटले होते. तर कोळी याला त्यांच्याविरुद्धच्या सर्व प्रकरणांतून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे." अशी माहिती निठारी हत्याकांड प्रकरणातील मोनिंदर सिंह पंधेर याच्या वकील मनिषा भंडारी यांनी सांगितले.

"मोनिंदर सिंह पंढेर याला फाशीची शिक्षा सुनावली होती. दोन खटल्यांमधील त्याच्या फाशीच्या शिक्षेविरुद्धच्या अपील केले होते. त्यातून त्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्याच्याविरुद्ध एकूण सहा खटले होते, त्यापैकी चार प्रकरणांमध्ये तो आधीच निर्दोष ठरला होता. त्याच्याविरुद्धच्या सर्व खटल्यांतून कोळीची निर्दोष मुक्तता झाली आहे. आता निठारी प्रकरणात मनिंदर सिंह पंढेर यांच्याविरुद्ध कोणताही खटला प्रलंबित नाही. त्यांची तुरुंगातून सुटका केली जाईल", असे पंधेर यांच्या वकील मनीषा भंडारी यांनी सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

निठारी हत्याकांड हे देशातील सर्वात कुख्यात गुन्हेगारी तपासांपैकी एक प्रकरण होते. २००६ मध्ये मोनिंदर सिंह पंढेर यांच्या उत्तर प्रदेशातील नोएडा येथील घरात आणि घराच्या आजूबाजूला अनेक मानवी अवशेष सापडले होते. या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी कोळी आणि पंढेर यांना अटक आणि त्यानंतर त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. बेपत्ता मुलांचे सांगाडे आणि इतर वस्तू नोएडाच्या निठारी परिसरातील त्यांच्या घराबाहेरील नाल्यातून सापडल्यानंतर मोनिंदर सिंह पंढेर आणि त्याचा घरकामगार सुरिंदर कोळी याला २९ डिसेंबर २००६ रोजी पोलिसांनी अटक केली होती.

काय होते प्रकरण?

बलात्कार, हत्या आणि पीडितांच्या शरिराचे अवशेष घराच्या अंगणात आणि नाल्यात टाकल्याचा आरोप असलेल्या कोळीला कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली आणि १५ फेब्रुवारी २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले होते.

कोळी हा 'सिरियल किलर' असून न्यायालयाने 'त्याला कोणतीही दयामाया दाखवली जाऊ शकत नाही' असे म्हटले होते. विशेष म्हणजे कोळी आणि त्याचा मालक मोनिंदर सिंह पंढेर यांच्यावर नरभक्षक आणि मृतदेहांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा (नेक्रोफिला) आरोप होता. कोळी याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल असून त्यापैकी १२ प्रकरणांमध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

निठारी सिरियल हत्याकांडातून उद्भवलेल्या काही प्रकरणांमध्ये पंढेर याला दोषी ठरवण्यात आले होते आणि काही प्रकरणांमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. पंढेर याने दोन खटल्यांमध्ये ट्रायल कोर्टाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news