भुवनेश्वर; वृत्तसंस्था : भारताचा अव्वल गोळाफेक अॅथलिट तेजिंदरपाल सिंह तूरने सोमवारी भुवनेश्वरमध्ये इतिहास रचला. राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपच्या अंतिम दिवशी त्याने 21.77 मीटरचा थ्रो केला. यासह तूरने स्वत:चाच आशियाई विक्रम मोडला. तसेच तो वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला. (Tajinderpal Singh)
पंजाबचे प्रतिनिधित्व करणार्या तेजिंदरपाल सिंग तूरचा 21.49 मीटरचा आशियाई विक्रम होता, जो त्याने 2021 मध्ये पटियाला येथे केला होता. कलिंगा स्टेडियमवर झालेल्या तिसर्या थ्रोमध्ये 28 वर्षीय तरुणाने 21.77 मीटर अंतरावर गोळा फेकला. या मोसमातील ही जगातील नववी सर्वोत्तम कामगिरी आहे. (Tajinderpal Singh)
तेजिंदरपाल सिंह तूर हा या वर्षाच्या अखेरीस होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा दावेदार आहे. मनगटाच्या दुखापतीमुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठण्यात त्याला अपयश आले. नंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. यामुळे तो काही काळ खेळापासून लांब होता.
वैयक्तिक आयुष्यातही तेजिंदरपाल सिंहला अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्याच्या पत्नीचा गर्भपात करावा लागला. तूर म्हणाला, मला अनेक धक्के बसले आहेत. पण मी नेहमी स्वतःला धीर देतो आणि पुढे चालू राहतो. माझी आजी गमावल्यानंतर मला ही स्पर्धा खेळायची नव्हती, पण आशियाई खेळांच्या चाचण्या होत्या, त्यामुळे मी कसा तरी स्वतःला तयार केले. देव मार्ग दाखवेल या विश्वासानेच मी इथे आलो आहे.
तेजिंदरपाल सिंहच्या आजीचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले. 21.77 मीटर फेकल्यानंतर डोळे मिटले आणि आजीची आठवण करून आकाशाकडे पाहिले. जेव्हा त्याला कळले की त्याने विक्रम मोडला आहे, तेव्हा तो थोडा भावूक झाला. त्याचे डोळे ओले झाले आणि मी क्षणभर आजीचा विचार करत होतो, असे त्याने सांगितले.
हेही वाचा;