पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानमधील लोकशाही सरकार हटवून सत्ता हिसकावून घेतलेल्या तालिबानी सरकारचे भयावह क्रौर्य पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवणार्या तालिबान सरकारवर जगभरातून टीका होत असतानाच, फुटबॉल स्टेडियमध्ये विविध गुन्ह्यांसाठी ९ जणांना चाबकाचे ३५-३९ फटके मारणे आणि चार दरोडेखोरांचे हात तोडण्यात आल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. ( Taliban publicly flogged )
या प्रकरणी 'द सन'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, १७ जानेवारी रोजी कंदहार प्रांतामधील अहमद शाही फुटबॉल
स्टेडियममध्ये विविध गुन्ह्यांतील आरोपींना आणण्यात आले. येथे मोठ्या जनसमुदायासमोर चक्क चार दरोडेखोरांचे हात तोडण्यात आले. तसेच विविध गुन्ह्यांतील ९ आरोपींना चाबकाचे ३५ ते ३९ फटके मारण्यात आले. या भयावह घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये काही लोक आरोपींना होणार्या शिक्षेची वाट पाहत बसले असल्याचे दिसत आहे.
विविध गुन्ह्यांतील आरोपींना चाबकाचे ३५ ते ३९ फटके मारण्यात आल्याच्या वृत्ताला अफगाणिस्तान राज्यपाल कार्यालयाचे प्रवक्ते दाजी झैद यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमधील पत्रकार आणि अफगाणिस्तानच्या माजी मंत्री शबनम नसिमी यांच्या माजी धोरण सल्लागार ताजुदेन सोरोश यांनीही स्टेडियमच्या बाहेरील दृश्याचे छायाचित्र ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. ९०च्या दशकाप्रमाणे आता अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा सार्वजनिक शिक्षा सुरु झाली आहे."
मागील महिन्यात अफगाणिस्तानमध्ये खून प्रकरणी आरोपीला सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली होती. तालिबान सरकार सत्तेत आल्यानंतर प्रथम सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात आली होती.
हेही वाचा :