चंद्रपूर : झरी धबधब्यावर पर्यटनाला जातायं…सावधान!

चंद्रपूर झरी धबधबा
चंद्रपूर झरी धबधबा
Published on
Updated on

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चिमुर तालुक्यात मुक्ताई धबधबा पर्यटनासह विदर्भात प्रसिध्द स्थळ आहे. सध्या पर्यटनस्थळावर प्रचंड गर्दी होवून पर्यटक पर्यटनाचा मनमुराद आनंद लूटत आहेत. परंतु याच पर्यटनस्थळापासून काही अंतरावर असलेल्या झरी धबधब्यावरही पर्यटनासाठी पोहोचत आहेत. चहूबाजूंनी डोंगरदऱ्या, हिरवेहिरवे प्रचंड दाट जंगल असल्याने या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्याची मजा काही औरच असते. मात्र या स्थळावर आपण जात असाल तर जरा सावधान..! या घनदाट जंगल परिसरात वाघांसह विविध हिस्त्र प्राण्यांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आपली एक चूक आयुष्यासाठी हानीकारक ठरू शकते.

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या मुक्ताई धबधबा पर्यटनासाठी प्रसिध्द स्थळ आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या स्थितीमुळे या ठिकाणी पर्यटकांचे येणे बंद होते. दोन वर्षाच्या कार्यकाळानंतर याठिकाणी धबधब्यावर नैसर्गिक सौंदर्य फुलले आहे. त्यामुळे या स्थळावर प्रचंड पर्यटकांची गर्दी उसळली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पर्यटकांच्यादृष्टीने हे स्थळ सुरक्षित असल्याने या ठिकाणी नागरिक पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या मुक्ताई धबधब्याची चर्चा पंचक्रोशीत असते.

याच चिमूर तालुक्यात आणि स्थळापासून काही अंतरावर झरी धबधब्याचे ठिकाण आहे. चारही बाजूंनी हिरवेगार घनदाट जंगल, डोंगराच्या रांगा आहेत. त्या धबधब्यातून ओसंडून वाहणारे पाणी पर्यटकांना मोहीत केल्याशिवाय राहत नाही. परंतु हे स्थळ घनदाट जंगलात असल्याने या ठिकाणी वन्यप्राण्यांचे वावर आहे. मुक्ताईच्या धबधब्याला भेट दिल्यानंतर काही पर्यटकांचे पाऊल या झरी धबधब्याकडे वळतात. आणि ते या ठिकाणी येऊन पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करतात. परंतु पर्यटकांचा हा आनंद क्षणिक ठरू शकतो. जीवाला हानी पोहोचविणारा ठरू शकतो. त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना सावधान करणे आता गरजेचे झाले आहे.

चिमूर तालुक्यातील नवतळा गावापासून अवघ्या २ किमी अंतरावर झरीचा छोटासा धबधबा प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणीदेखील काही पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. या पर्यटनस्थळाची फारशी प्रसिध्दी झालेली नाही. मात्र, मुक्ताई धबधब्यावर गेल्यानंतर हौशी पर्यटकांना याची माहिती मिळते. त्यामुळे पर्यटक जवळच आल्यानंतर त्या ठिकाणी भेट देण्याचा विचार करतात. मात्र हे भेट देणे जिवावर बेतू शकते.

चिमुर वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या झरी पर्यटनस्थळ परिसरात हिस्त्र वन्य प्राण्यांचा वावर आहे. या जंगल परिसरात गावातील नागरिकांना, गुराख्यांना व परिसरातून आवागमन करणाऱ्यांनाही त्यांचे अनेकदा दर्शन झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक सावधगिरी बाळगून आहेत. जंगल परिसर घनदाट वृक्षांनी नटलेले असल्याने वाघ, बिबट्या, अस्वल आणि विविध प्रकारच्या वन्यजीवांचे वास्तव्य या ठिकाणी आहे. त्यामुळे झरी पर्यटनाला येतायं तर सावधानता बाळगा… असा इशारा देणे पर्यटनाच्या दृष्टीकोणातून महत्वाचे ठरते आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news