

बीजिंग : वृत्तसंस्था चीनने गेल्याच आठवड्यात हॅनॉनमधील वेनचांग प्रक्षेपण केंद्रावरून सौरऊर्जेवर चालणार्या नव्या प्रयोगशाळेसह 'लाँग मार्च 5 बी' हे 21 टन वजनाचे रॉकेट सोडले होते. अंतराळ स्थानकात प्रयोगशाळा सुखरूप पोहोचवून परतीच्या वाटेवर त्यावरील नियंत्रण सुटलेले आहे. या रॉकेटचा पृथ्वीच्या वातावरणात पोहोचताच स्फोट होईल आणि ते पृथ्वीवर कुठे आदळेल, सांगता येत नाही.
चीन हा जगासाठी एक मोठे संकट आहे, या ब्रिटनमधील पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील आघाडीचे उमेदवार ऋषी सुनक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर केवळ दोन-तीन दिवस उलटलेले आहेत आणि चीनने अंतराळात सोडलेले मेगारॉकेट पृथ्वीवर कोसळण्याच्या मार्गावर आहे. चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार उडविल्यानंतर आता चीनच्या या रॉकेटने जगाची चिंता वाढविली आहे.
रॉकेटच्या स्फोटामुळे अंतराळ कचर्याची समस्या तीव्र बनणार आहे. गतवर्षी हिंदी महासागरात चीनचे असेच एक रॉकेट कोसळले होते.
रॉकेट पाण्यात कोसळल्याने मनुष्यहानी झाली नाही; पण सागरी पर्यावरणाला मोठे नुकसान त्यामुळे पोहोचले होते. चीनचे मेगारॉकेट स्फोटानंतर भंगार होऊन पृथ्वीवर नेमके कोठे कोसळेल, हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे या रॉकेटवर अवघ्या जगाच्या नजरा खिळल्या आहेत. लोकवस्तीच्या जागी ते कोसळू नये, अशी प्रार्थना लोक करत आहेत. रॉकेटचा रोख बघता दाट लोकवस्तीच्या ठिकाणावर ते कोसळणार नाही, अशी दिलासा देणारी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविलेली असली, तरी याबाबत ते शंभर टक्के ठाम नाहीत.
गेल्या आठवड्यातच प्रक्षेपण
चीनने गेल्याच आठवड्यात हॅनॉनमधील वेनचांग प्रक्षेपण केंद्रावरून सौरऊर्जेवर चालणार्या नव्या प्रयोगशाळेसह हे रॉकेट आपल्या अंतराळ स्थानकासाठी सोडले होते.
बीजिंग : चीनने गेल्याच आठवड्यात सोडलेल्या या रॉकेटचा परतीच्या प्रवासात पृथ्वीच्या वातावरणात पोहोचताच स्फोट होईल आणि ते पृथ्वीवर कुठे आदळेल, हे सांगता येत नाही.
गतवर्षी मे महिन्यातही चीनचे रॉकेट कोसळले होते. यावेळीही असेच घडणार आहे. अंतराळ कार्यक्रमाबाबतचे मानदंड चीन पाळत नाही. अंतराळ कचर्याबाबत तर चीन कमालीचा बेजबाबदार आहे. रॉकेटच्या परतीचा प्रवासही सुरक्षित असावा, याच्याशी चीनला काही देणेघेणेच नाही असा दावा नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी केला.
हेही वाचा