

पणजी; पुढारी वृत्तसेवा : पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वित्त खात्याने (महसूल आणि नियंत्रण) राज्यात तीन दिवस दारू विक्रीवर बंदी जाहीर केली आहे. त्यानुसार 9 ऑगस्ट म्हणजेच मतदानाच्या आदल्या दिवशी, 10 ऑगस्ट म्हणजे मतदानादिवशी व 12 ऑगस्ट म्हणजे निकालाच्या दिवशी राज्यात सर्वत्र दारू विक्री करता येणार नाही.
या तीन दिवसांत रेस्टॉरंट आणि बारचा परवाना असणार्या आस्थापनात रेस्टॉरंट सुरू ठेवता येईल; मात्र बार बंद ठेवावे लागतील, असेही आदेशात म्हटले आहे. या काळात रेस्टॉरंट आणि बार मालकांनी जेवण मिळेल; मात्र दारू मिळणार नाही, असे फलक लावणे आवश्यक असल्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे.
प्रवासादरम्यानची मुभा
खात्याने काढलेल्या दुसर्या आदेशानुसार वरील तीन दिवसांत राज्यात एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी दारूची वैयक्तिकरीत्या वाहतूकही करता येणार नाही. या काळात प्रवासादरम्यान व्यक्तीला देशी, परदेशी व गावठी बनावटीच्या तीन क्वार्टर व 650 मिलीच्या सहा बीअर सोबत ठेवण्यास परवानगी असेल.