पुढारी ऑनलाईन डेस्क
पतीच्या चारित्र्यावर संशय घेणे, त्याचे सहकारी महिलांसोबत संबंध जोडणे, त्याच्या कार्यालयात जावून धिंगाणा घालणे आणि कोणताही पुरावा सादर न करता त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करणे ही एक प्रकारची क्रुरताच आहे, असे निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान नोंदवले. संबंधित पतीला न्यायमूर्ती व्ही. एम. वेलुमणी आणि एस. सौन्थर यांच्या खंडपीठाने घटस्फोटही मंजूर केला.
पती वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक तर पत्नी शिक्षिका आहे. त्यांचा विवाह १० नोव्हेंबर २००८ रोजी झाला होता. विवाहानंतर ते अडीच वर्ष एकत्र राहिले. मात्र यानंतर दोघांमधील मतभेद वाढले. प्राध्यापक पतीचे सहकारी महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत, तो तिच्याशी रात्री उशिरापर्यंत बोलतो, अशी तक्रार पत्नीने स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली होती. यानंतर आपल्याला पतीला भेटायचे आणि मुलीच्या भविष्यासाठी पतीसोबत राहायचे आहे, असे तिने कौटुंबिक न्यायालयात सांगितले. .
आपली पत्नी सातत्याने चारित्र्यावर संशय घेते. कामाच्या ठिकाणी येवून महिला सहकार्यांशी माझे संबंध जोडते. तसेच कॉलेजमधील विद्यार्थी व सहकार्यांसमोर शिवीगाळ करण्याचे प्रकारही तिने केला. याप्रकरणी कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला पतीने उच्च न्यायालयातआव्हान दिले होते.
५ जुलै रोजी पतीच्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीवेळी खंडपीठाने स्पष्ट केले की, "पती ज्या कॉलेजमध्ये कार्यरत होता तेथे त्याची पत्नी गेली होती. तिने कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसमोर पतीचे सहकारी महिलांबरोबर संबंध असल्याचा आरोप केला. पत्नीच्या या कृत्यामुळे पतीच्या प्रतिमेचे मोठे नुकसान झाले. ही कृती हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३(१) च्या अर्थानुसार क्रुरतेशी जोडला जावू शकते."
पतीने उच्च न्यायालयात स्पष्ट केले की, पत्नी २०११ पासून वेगळी राहत आहे. विवाहित असल्याचे प्रतीक म्हणून महिला मंगळसूत्र या आभूषणाला पवित्र मानतात;पण पत्नीने २०११ मध्येच मंगळसूत्रही काढून टाकले आहे, असा युक्तीवाद पतीच्या वकिलांनी केला. मात्र आपण मंगळसुत्रातील केवळ साखळी काढून टाकली आहे, तसेच यामुळे वैवाहिक जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पत्नीच्या वकिलांनी स्पष्ट केले.
मंगळसूत्र काढून टाकणे हे वैवाहिक जीवन संपुष्टात आणण्यास पुरसे आहे, असे आम्ही म्हणणार नाही. मात्र मंगळसूत्र काढताना पत्नीचे कृत्य हे विभक्त होण्याच्या पुराव्यापैकी एक आहे. हे कृत्य पक्षकाराला तोडजोड करण्याची आणि वैवाहिक जीवन पुढे सुरु ठेवण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट करते, असेही सांगत खंडपीठाने पतीला घटस्फोट मंजूर केला.
हेही वाचा :