हिंजवडीतील कोंडी सोडवण्यासाठी प्रशासन सरसावले; पुण्यावरून येणारी वाहतूक सूस-म्हाळुंगे मार्गाने वळविण्याचा प्रयत्न | पुढारी

हिंजवडीतील कोंडी सोडवण्यासाठी प्रशासन सरसावले; पुण्यावरून येणारी वाहतूक सूस-म्हाळुंगे मार्गाने वळविण्याचा प्रयत्न

हिंजवडी : आयटीपार्क हिंजवडी वाकड परिसरात वाहतूककोंडी हा नित्याचाच आणि गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. यासाठी प्रशासन आता सज्ज झाले आहे. हिंजवडीला पुण्यावरून येणारी वाहतूक सूस-म्हाळुगे व अन्य पर्यायी मार्गानी वळविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. धो-धो बरसणार्‍या पावसामुळे भूमकर चौक व मेट्रोच्या कामामुळे हिंजवडीच्या शिवाजी चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आयटीतील मुख्य रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने रोजच चक्का जाम होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठल्यामुळे वाहतूक ठप्प होत आहे.

हिंजवडीला पुण्यावरून येणारी वाहतूक सूस-म्हाळुगे व अन्य पर्यायी मार्गानी वळविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शुक्रवारी (दि. 8) दुपारी त्यांनी अनेक दिवसांपासून रखडलेल्या माण-म्हाळुंगे टीपी स्कीममधून येणार्‍या रस्त्याची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर हिंजवडीची वाहतूककोंडी फोडण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलिस उपायुक्त आनंद भोईट यांनी हिंजवडीतील रखडलेल्या कामांची माहिती घेतली.
हिंजवडी माण-म्हाळुंगे हा प्रस्तावित रस्ता का रखडला आहे याबाबतची माहिती घेतली. आनंद भोईटे यांनी पर्यायी रस्त्यांची पाहणी करून हे रस्ते तातडीने पूर्ण करण्याचे किंबहुना वाहतूक त्या मार्गे वळविण्याचे संकेत दिले आहेत. हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, विक्रम साखरे, माणचे माजी उपसरपंच संदीप साठे यांच्यासह स्थानिक शेतकर्‍यांशी त्यांनी संवाद साधत रस्त्यांच्या अपूर्ण कामांची माहिती घेतली. हे रस्ते अनेक वर्षांपासून कोणत्या कारणास्तव रखडले याचा आढावाही घेतला.

आयटी पार्कला जोडणारा वाकडच्या सूर्या अंडरपास ते ब्लूरिज सोसायटी व म्हाळुगे मार्गे माण या दोन्ही रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे दोन्ही रस्ते पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या कक्षेत असून, माणमधील काही शेतकर्‍यांना मोबदला मिळाला नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे किमान ज्या ठिकाणी भूसंपादनास अडथळा येत नाही तेथील रस्ते पूर्ण करण्याबाबत प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली. मंगळवारी (दि. 12) याविषयीची चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली असल्याचे भोईट यांनी सांगितले.

Back to top button