कौतुकास्पद ! जामखेडला एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू

कौतुकास्पद ! जामखेडला एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू

जामखेड :  पुढारी वृत्तसेवा :  समाजात एकल महिलांचा प्रश्न अधिकाधिक गंभीर बनत चालला आहे. विधवा, घटस्फोटित, परितक्त्या, अविवाहित महिलांची संख्या समाजात मोठी आहे. त्यांना स्वावलंबी व सक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्हाभर एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांना सक्षम व स्वावलंबी केल्यास कोणाच्याही आधाराविना स्वतःसह मुलाबाळांचे जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतात, अशी येरेकर यांची संकल्पना आहे. या संकल्पनेचे राज्य शासन व राज्य महिला आयोगाने कौतुक केले.

संबंधित बातम्या :

यापुढे जाऊन या महिलांचे ऑनलाईन सर्वेक्षण करण्याचे आदेश येरेकर यांनी दिले आहेत. त्यानुसार एकल महिलांचे ऑनलाइन सर्वेक्षण पुढील चार दिवसांत तालुकानिहाय पार पडणार आहे. सर्वेक्षणातून मिळणार्‍या माहितीनुसार या सर्व महिलांना मदतीचा एक हात देऊन जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या पदरात कसा पडेल, यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे. हे सर्वेक्षण ऑनलाइन पद्धतीने ग्रामपंचायती मार्फत ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी करणार आहेत. सर्व महिलांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यातूनही एखादी एकल महिला वंचित राहिली, तर त्यांनी तत्काळ ग्रामपंचायतीशी संपर्क साधून आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वेक्षणात एकल महिलांनी नोंदणी करून घ्यावी. सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकार्‍यांनी त्यासाठी ग्रामसेवकांना मदत करावी. वंचित महिलांनी तत्काळ ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा.
                                              – प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, जामखेड

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news