Chhatrapati Sambhajinagar : नामांतरानंतरही कागदपत्रांवर अद्यापही औरंगाबाद, उस्मानाबादचं

Chhatrapati Sambhajinagar : नामांतरानंतरही कागदपत्रांवर अद्यापही औरंगाबाद, उस्मानाबादचं
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शहरात कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीपुर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केले. मात्र, या नामकरणानंतर देखील अद्यापही शासन निर्णयावर औरंगाबाद आणि उस्मानाबाद असाच उल्लेख केला जात आहे. तर शासनाच्या आॅनलार्इन कागदपत्रांवर देखील शहरांची जुनीच नावे आहेत. त्यामुळे अधिकारी आणि नागरिक देखील संभ्रमावस्थेत आहे.

महाराष्ट्र महसूल संहितेच्या कलम ४ नुसार जिल्हा अथवा तालुक्याचे नामकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचे सांगत १६ सप्टेंबर रोजी स्मार्ट सिटी कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव अशा नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. या नामकरणाला आव्हान देणाऱ्या याचिका मुख्य न्यायमुर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमुर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठात दाखल आहेत. त्यावर बुधवारी (४ आॅक्टोबर) अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही जिल्ह्यांच्या नामकरणासंबंधी १५ सप्टेंबरच्या रात्री अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मंत्री मंडळाच्या बैठकीपुर्वी जिल्ह्यांचे नामकरण करण्यात आले. यानंतर शहराच्या महसूल विभागातील पाट्या नवीन नामकरणानुसार रंगविण्यात आल्या. मात्र, अद्यापही अनेक विभागात 'औरंगाबाद' नावानेच पाट्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या सातबारा, आधारकार्ड, रहिवासी, उत्पन्न याशिवाय पीआर कार्ड, रजिस्ट्री अशा अन्य शासकीय कागदपत्रांवर देखील औरंगाबाद असाच उल्लेख केला जात आहे.

शासन निर्णयावरही औरंगाबाद, उस्मानाबाद

मंत्री मंडळाच्या १६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर दोन्ही जिल्ह्यांचे नामकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या अभियोग संचालनालय, शिक्षण विभाग, मानव विकास आयुक्तालयाच्या शासन निर्णयावर औरंगाबाद असाच उल्लेख आहे. २० सप्टेंबर रोजीच्या ग्रामविकास विभागाच्या पाणी पुरवठा, विभागीय आयुक्त, महसूल व वन विभाग, कौशल्य, व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण मंडळ या संदर्भातील शासन निर्णयावर औरंगाबाद, उस्मानाबाद असा उल्लेख आहे. याशिवाय उपविभागीय जलसंधारण, गृहविभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, गुण नियंत्रण मंडळ या विभागांसाठी जारी केलेल्या २७ सप्टेंबरपर्यंतच्या शासन निर्णयावर औरंगाबाद आणि उस्मानाबाद अशीच नावे आहेत.

नाव बदलासाठी कोटींचा खर्च

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्माबादचे धाराशिव असे आॅनलार्इन नामकरण करण्यासाठी कोट्यावधींचा खर्च शासनाला करावा लागणार आहे. दोन्ही जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतीपासून महानगर पालिका, शैक्षणिक विभाग, महामंडळे, शासकीय कार्यालय यासह अन्य विभागातील सॉफ्टेवेअरमध्ये तसेच कार्यालयाबाहेरील पाट्यांच्या नावांमध्ये बदल करावा लागणार आहे.

सॉफ्टवेअरमध्ये बदलांची प्रक्रिया सुरु

औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख सॉफ्टवेअरमध्ये करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. मात्र, त्याला किती अवधी लागेल असे नेमके सांगता येणार नाही.

आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news