अतिरिक्त उत्पन्न : कर्जफेड की इक्विटीत गुंतवावे?

investment
investment

एप्रिलचा महिना हा कर्मचार्‍यांसाठी मागील आर्थिक वर्षातील वार्षिक बोनस मिळण्याचा असतो. अप्रायजल चांगले झाले तर घसघशीत बोनस आणि वेतनवाढ मिळण्याची अपेक्षा असते. हातात अधिक पैसे पडल्यानंतर आनंद होतोच; पण मनात संभ्रमही निर्माण होतो. या पैशाचे करावे काय? असा प्रश्न उपस्थित होतो.

आपल्याला बोनस, वेतनवाढ किंवा अन्य कोणत्याही कारणाने अतिरिक्त उत्पन्न होत असेल, तर अशा वेळी मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. गृहकर्ज लवकर फेडणे फायद्याचे राहील का? या पैशांची इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी का? सोने खरेदी करावे? असे प्रश्न पडतात.

नफा आणि नुकसानीचे आकलन करा

गृहकर्जात प्री-पेमेंट करणे आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे यापैकी एकाचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही पर्यायांच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंवर विचार करायला हवा. यासाठी गृहकर्जाचा व्याजदर आणि म्युच्युअल फंडचा संभाव्य वार्षिक परतावा याची तुलना करण्याबरोबरच दोन्ही स्थितीत कराचा फरकही जाणून घेतला पाहिजे. शिवाय आर्थिक ध्येय, जोखीम उचलण्याची क्षमता आणि लिक्विडीटीच्या स्थितीवर देखील विचार करायला हवा. या सर्व गोष्टींवर सर्वंकष विचार केल्यानंतरच निर्णय घेणे योग्य राहील. या पैलूंवर बारकाईने विचार करायला हवा.

लिक्विडीटीवर परिणाम

गृहकर्ज लवकर फेडण्याचा निर्णय घेण्याअगोदर भांडवल तरलतेचे आकलन करायला हवे. म्हणजेच अतिरिक्त कमाईची किती गरज भासणार आहे, तसेच त्याची भविष्यात गरज पडू शकते का? हेदेखील तपासले पाहिजे. आपण बोनसच्या रूपातून मिळालेले पैसे गृहकर्जात जमा केले तर ते परत मिळणार नाहीत. त्याचवेळी इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जमा केलेली गुंतवणूक गरज भासल्यास काढतादेखील येते.

जोखीम उचलण्याची क्षमता

गृहकर्ज लवकर फेडण्यासाठी भरण्यात येणार्‍या पैशाची कोणतीही जोखीम राहत नाही. ती रक्कम थेट गृहकर्जात जमा होते आणि कर्जाची रक्कम कमी होते. गृहकर्जावर 8.5 टक्के वार्षिक व्याज देत असाल आणि ते लवकर फेडण्यासाठी एखादी रक्कम भरत असाल, तर त्यावर 8.5 टक्के परतावा हा हमखास मानला जाईल. त्याचवेळी इक्विटी म्युच्युअल फंडवर 12 टक्क्यांचा अपेक्षित परतावा गृहीत धरतो. मात्र, त्याची हमी नसते. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जोखीम उचलण्याच्या क्षमतेचे आकलन करायला हवे.

गुंतवणुकीचे ध्येय

आपल्यासाठी गृहकर्जाचे प्री-पेमेंट चांगले राहील की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे, या गोष्टी गुंतवणुकीच्या ध्येयावर अवलंबून आहेत. दीर्घकाळ नियमितपणे गुंतवणूक करत निवृत्तीसाठी निधी उभारण्याचा विचार करत असाल किंवा मुलांच्या शिक्षणाचा विचार करत असाल, तर म्युच्युअल फंड हा आपल्यासाठी चांगला पर्याय राहू शकतो. मात्र, आपल्या निवृत्तीला अधिक वय राहिलेले नसेल आणि चांगल्या परताव्यासाठी नियमित गुंतवणूक करण्याची स्थिती नसेल, तर गृहकर्ज लवकर फेडणे फायद्याचे राहील.

कराचे आकलन

दोन्हींपैकी एकाच्या पर्यायाची निवड करताना कर आकारणी कशी राहू शकते किंवा त्याचा कितपत परिणाम राहू शकतो, हे पाहावे लागेल. कारण गृहकर्जाचे व्याज भरल्याने सेक्शन 24 बीनुसार वर्षात दोन लाखांपर्यंत अतिरिक्त करसवलत मिळते. याशिवाय मुद्दल भरल्यास कलम 80 सीनुसारदेखील करसवलत मिळत असते. वास्तविक, कलम 80 सीनुसार वार्षिक दीड लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवरील करसवलतीचा लाभ हा इक्विटी म्युच्युअल फंडमध्येदेखील मिळतो. मात्र, सेक्शन 24 बीनुसार दोन लाखांपर्यंतची अतिरिक्त करसवलत केवळ गृहकर्जाच्या व्याजावरच मिळू शकते. आपण आपले गृहकर्ज लवकर फेडत असाल तर त्यानंतर त्याचा लाभ मिळणार नाही. अर्थात, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तीन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास वार्षिक एक लाखांपर्यंतच्या नफ्यावर कोणताही कर आकारला जात नाही. मात्र, त्यापेक्षा अधिक नफा मिळत असेल तर केवळ दहा टक्के दराने लाँग टर्म कॅपिटल गेन्स (एलटीसीजी) कर भरावा लागतो. एका अर्थाने करबचतीच्या द़ृष्टीने हा चांगला पर्याय आहे.

हे लक्षात ठेवा

अतिरिक्त फंड किंवा सॅलरीचा उपयोग करण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी गृहकर्जाचा व्याजदर किती आहे आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याने किती परतावा अपेक्षित आहे, हे पाहिले पाहिजे. गृहकर्जाचा व्याजदर 8.5 ते 9.5 टक्के यादरम्यान असेल आणि इक्विटी म्युच्युअल फंडमधून वार्षिक बारा टक्के परतावा गृहीत धरत असाल, तर साहजिकच म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही फायद्याची राहू शकते कारण इक्विटी फंडमधील गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा गृहकर्जाच्या व्याजदराच्या तुलनेत अडीच टक्के जादा आहे. त्याचवेळी इक्विटी फंडमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्याने त्यावरचा परतावा हा गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षा अधिक असतो, हे लक्षात येईल. एसआयपीच्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास कम्पाऊडिंग आणि अ‍ॅव्हरेजिंगचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच केवळ रिटर्न अणि ग्रोथच्या द़ृष्टिकोनातून पाहिले, तर इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक हा चांगला पर्याय राहू शकतो.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news