गृहकर्ज अगोदरच फेडावे की गुंतवणूक सुरू ठेवावी? | पुढारी

गृहकर्ज अगोदरच फेडावे की गुंतवणूक सुरू ठेवावी?

सुभाष वैद्य

अमेरिकेतील महागाईचा दर खाली येत नसल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीसाठी ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी तर फेडच्या एका सदस्यांनी व्याजदर वाढूही शकतात, अशा प्रकारचे विधान करून खळबळ उडवून दिली. परिणामी, इकडे आपल्याकडेही आरबीआय रेपोदर कपातीचा निर्णय लांबणीवर टाकताना दिसत आहे. याचाच अर्थ आणखी दोन-तीन महिने तरी कर्जाचा हप्ता कमी होणार नाहीये. अशा वेळी काही मंडळी गुंतवणूक कमी करत ते पैसे गृहकर्जात भरून त्याचा भार कमी करण्याचा विचार करत आहेत.

संबंधित बातम्या : 

गृहकर्जावरील व्याजदर जादा राहण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे आरबीआयकडून व्याजदर कपात होण्याची तूर्त शक्यता नाही म्हणून गृहकर्ज घेतलेल्या लोकांचा कर्जाचा हप्ता काही काळ अधिक राहू शकतो. सध्या गृहकजार्चा हप्ता भरण्याबरोबरच म्युच्युअल फंड एसआयपी भरणारेही अनेक जण असतात. सध्या शेअर बाजार उच्चांकी पातळीवर आहे. अशा वेळी अनेक जण गुंतवणूक रक्कम कमी करून गृहकर्जाचा हप्ता वाढविण्याचा विचार करत आहेत. तो योग्य की अयोग्य हे स्थितीवर अवलंबून राहू शकते. अर्थात, गृहकर्ज वेळेच्या आत फेडले तर बरीच रक्कम वाचवता येणे शक्य आहे. तरीही वेळेच्या अगोदर कर्जफेडीच्या मुद्द्यावर अधिक भर देण्याची फारशी गरज वाटत नाही.

घाईगडबडीत प्री-पेमेंट करणे योग्य नाही

प्री-पेमेंटबाबत वेगवेगळे मत असू शकते. गृहकर्ज लवकर संपवणे आणि आपल्या जीवनातील अन्य फायनान्शिअल गरजा यात ताळमेळ असणे गरजेचे आहे. मग आपण काय करायला हवे. उदा. आपल्या गृहकर्जाचा व्याजदर 8.75 टक्के असेल, तर होम लोनचा आकार आणि सेक्शन 24 बी नुसार मिळणार्‍या करसवलतीनंतर होम लोनचा इफेक्टिव्ह इंटरेस्ट कमी होतो आणि तो 8 टक्के राहतो.

प्री-पेमेंटने कर्जाचे ओझे कमी

आपण वेळेच्या अगोदर गृहकर्ज फेडत असाल, तर आपल्याला राहिलेल्या रकमेवर 8.75 टक्के व्याज भरण्याची गरज भासणार नाही. आता त्याची तुलना आपण गुंतवणुकीशी करू. गेल्या दोन वर्षांत शेअरमधील गुंतवणूक ही चांगली राहिली आहे. आपल्या इक्विटी पोर्टफोलिओचा ‘एक्सआयआरआर’ हा आपल्या होम लोनच्या व्याजदरापेक्षा अधिक असेल.

शेअर बाजारातील घसरणीने परतावा कमी

थोडा वेगळा विचार केला तर बाजारात काही काळ सुस्ती येऊ शकते. अशा वेळी शेअर बाजारावर मिळणारा परतावा हा कमी होऊ शकतो म्हणून आपण गुंतवणुकीतील रक्कम कमी करत ती गृहकर्जात पैसे भरण्याची तयारी करू शकता. या रणनीतीने होणारी बचत आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा यातील फरक समजून घ्यावा लागेल.

दीर्घकाळासाठी इक्विटीतील परतावा चांगला

दीर्घकाळात इक्विटी बाजारातून दहा ते बारा टक्के सरासरीने परतावा मिळू शकतो. अर्थात, ही बाब गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षा नेहमीच अधिक राहिली आहे. गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची शक्यता असते; परंतु हमी नसते. शेअर बाजारात आपल्याला दीर्घकाळासाठी दहा ते बारा टक्के परतावा मिळू शकतो; परंतु त्याची हमी देता येणार नाही.

गुंतवणूक थांबविण्याचा निर्णय

आपण प्री-पेमेंट करत नसाल आणि गुंतवणूक सुरू ठेवत असाल, तर तो एक चांगला निर्णय राहू शकतो; परंतु बाजार कोसळत असेल आणि आपण प्री-पेमेंट करत नसाल, तर तो निर्णय योग्य ठरणार नाही. म्युच्युअल फंडसवर मिळणार्‍या परताव्याची हमी नाही. मात्र, इतिहास पाहिला तर दीर्घकाळासाठी म्युच्युअल फंडवरील परतावा हा गृहकर्जाच्या व्याजदराच्या तुलनेत अधिक राहिला आहे. त्यामुळे आक्रमक रूपाने कर्जात पैसे भरण्याऐवजी गुंतवणूक सुरू ठेवणे हा चांगला निर्णय राहील.

अधिक वय असेल तर प्री-पेमेंट करणे योग्य

आपल्या वयाच्या हिशोबाने गृहकर्जाकडे पाहिले पाहिजे. जर आपले वय कमी असेल, तर आपल्याकडे बराच वेळ आहे. अशा स्थितीत गुंतवणुकीच्या तुलनेत कर्जफेड करण्याच्या पर्यायाला फारसे महत्त्व दिले जात नाही. मात्र आपण निवृत्तीच्या जवळ आला असाल आणि बरेच कर्ज शिल्लक राहिले असेल तर अशा वेळी कर्ज लवकर फेडण्याचा निर्णय हा चांगला राहू शकतो.

हेही वाचा : 

Back to top button