पुणे / बिबवेवाडी, : पुढारी वृत्तसेवा : आईच्या आजाराचे कारण सांगून आमदारांना पैसे मागणारे दोघेही उच्च शिक्षित तरुण-तरुणी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांनी स्पर्धा परिक्षेच्या क्लासचे पैसे भरण्यासाठी व इतर बाबींसाठी पैसे मागितल्याचे तपासात पोलिसांना सांगितले. या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी औरंगाबाद येथील एका टपरीवरून चहा पित असताना अटक केली. परिमंडळ 5 च्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आमदार माधूरी मिसाळ यांना फोन करून आई आजारी असल्याचे सांगत त्यांच्याकडून 3 हजार 400 रुपये गुगल पे द्वारे घेत एकाने फसवणूक केली होती. मिसाळ यांच्या सोबतच आमदार श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे यांनाही असाच फोन करून त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले होते. या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करून एक टिम बुलढाणा व एक टिम औरंगाबाद येथे रवाना करण्यात आली. पथकाने त्या ठिकाणी जाऊन आरोपीतांचा शोध घेतला. दोघांनाही औरंगाबाद येथून अटक करण्यात आली.
हे दोघेही एमपीएसची तयारी करतात. त्यांची एका क्लासमध्ये ओळख झाली होती. युवकाचे बीए झाले असून, युवती ही बीएससी झाली आहे. त्यांच्या घरची परिस्थीती बेताची आहे. त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती. पण पैसे नव्हते. घर खर्चालाही त्यांच्याकडे पैसे नव्हते. आमदार माधुरी मिसाळ या मदत करतात असे त्यांना माहिती झाले. त्यांचा नंबर मिळवत रमेशन मिसाळ यांना फोन करत आई आजारी असल्याचे कारण देत पैसे मागितले. त्यांनीही सामाजिक जाणिवेतून त्यांना मदत केली. याच दरम्यान इतर आमदारांकडूनही त्यांनी अशा पध्दतीने मदत मिळवली असल्याचे तपासात समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोडे, गुन्हे निरीक्षक अनिता हिवरकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, उपनिरीक्षक विवेक मिसाळ,अमंलदार अतुल महांगडे, तानाजी सागर,सतिष मोरे यांनी तपास केला.
अटक करण्यात आलेले दोघेही उच्च शिक्षीत आहेत. त्यांच्या शिक्षणामध्ये व घरगुती अडचणी आल्याने असा चुकीचा मार्ग त्यांनी निवडला. त्यांना ज्या तीन आमदारांनी पैसे दिले होते. ते त्यांनी त्यांना परत पाठविल्याचे व याबद्दल त्यांनी संबंधीत आमदारांची माफी देखील मागितल्याचे तपासात सांगितले आहे. परंतु, यातील सत्यता तपासामध्ये समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
तरुणाने आईच्या अजारपणाचे कारण सांगून आमदारांकडून तरुणीच्या गुगल पे वर पैसे मिळवले. मात्र, दोघांवरही याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाल्याने त्यांचे करिअर पणाला लागले आहे. तरुण नुकताच पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पोलिस भरतीत उतरला होता. तेथे त्याला चांगले गुणही मिळाले होते. काही थोड्याशा गुणांवरून त्याची संधी हुकली होती. तरीही न डगमगता तो पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची तयारी करत असल्याचे सुत्रांन सांगितले.
तरुणाचे आई-वडील गावाकडे शेती करतात त्यांची परिस्थिती अत्यंत बेताची असताना तो शिकून स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. गावाकडील शेतातील विहरीचा कठडा तुटल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने अशा पध्दतीने पैसे मिळविल्याचेही कारण त्यांनी सांगितल्याचे समोर आले आहे.
तरुण, तरुणीने हा फसवणूकीचा प्रकार केल्यानंतर त्यांना यासाठी अटक करण्यात येईल, याची कल्पना अटक करेपर्यंत नव्हती. जेव्हा त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली तेव्हा त्यांना त्यांनी केलेला गुन्हा लक्षात आला. त्यांच्या ध्यानी, मनी नसताना दोघांना औरंगाबाद येथील एका चहाच्या टपरीवर चहा पित असताना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे याबाबत विचारणा केल्यानंतर आम्हाला आमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, याची माहिती नसल्याचे ते विचारपूस करताना म्हणाले.