यंदा गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त! : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

यंदा गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त! : मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदा गणेशोत्‍सव आणि दहीहंडी, मोहरम जोरदार साजरे करता येणार आहेत. कोविडनंतर पहिल्यांदाच हे सर्व उत्सव निर्बंधमुक्त साजरे करता येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आज याबाबत घोषणा केली.

कोविडमुळे गेली दोन वर्ष गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम आणि बाकी सर्वच सण साजरे करताना शासनाने अनेक निर्बंध लादले होते. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून हे सण अगदीच साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत होते. मात्र, यावर्षी असे कोणतेही निर्बंध या सणांवर नसणार आहे. त्यामुळे यंदा हे सण मोठ्या उत्साहात साजरे करता येणार आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की यंदा सर्व सण निर्बंधमूक्त होणार आहे. तर गणेशउत्सवासाठी एस.टी.च्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. मंडळांकडून यावेळी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हा मोठा निर्णय गणेश मंडळांसाठी घेण्यात आला आहे. तसेच ऑनलाइन दर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली असून धर्मदाय आयुक्तांकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तर पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण केले जाणार असून मुंबई-पुणे या भागातून कोकणात गणेशभक्तांसाठी जाणा-या गाड्या टोल मूक्त केले जाणार आहे.

याशिवाय दहीहंडी साजरी करताना न्यायालयाचे सर्व नियम पाळून ती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सण उत्सवांसाठी मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

Back to top button