Michael Bracewell : टी 20 च्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक! न्यूझीलंडच्या ब्रेसवेलने रचला इतिहास | पुढारी

Michael Bracewell : टी 20 च्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक! न्यूझीलंडच्या ब्रेसवेलने रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडने दुसऱ्या टी 20 मध्ये आयर्लंडचा 88 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. डॅन क्लीव्हर आणि मायकेल ब्रेसवेल (Michael Bracewell) हे किवी संघाच्या या विजयाचे हिरो ठरले. क्लीव्हरने 55 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 78 धावांची खेळी केली, तर ब्रेसवेलने टी 20 करिअरच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेत यजमान संघाचे कंबरडे मोडले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 179 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संपूर्ण संघ 13.5 षटकात 91 धावांमध्ये गारद झाला. (Michael Bracewell historic Hat trick for New Zealand)

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टिन गप्टिल आणि फिन ॲलन यांनी पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. अॅलन 35 धावा करून बाद झाला. गप्टिलही 11 धावा करून माघारी परतला. दोन विकेट झटपट गमावल्यानंतर क्‍लीव्हरने वेगवान फलंदाजी केली. त्याने 55 चेंडूत नाबाद 78 धावा केल्या. त्याच्याशिवाय ग्लेन फिलिप्सनेही 23 धावा केल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडने 4 गडी गमावून 179 धावा केल्या. आयर्लंडकडून क्रेग यंग आणि जोशुआ लिटल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. (Michael Bracewell historic Hat trick for New Zealand)

प्रत्युत्तरात खेळताना आयर्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. पॉल स्टर्लिंग 21 आणि बालबर्नी 10 धावांवर बाद झाले. यानंतर एकापाठोपाठ एक विकेट्स पडत गेल्या आणि त्यांचा संघ 91 धावांमध्येच ऑलआऊट झाला. सलग तीन विकेट घेत ब्रेसवेलने (Michael Bracewell) हॅट्ट्रिक मिळवली. न्यूझीलंडकडून ईश सोधी आणि ब्रेसवेलने प्रत्येकी 3 बळी तर जेकब डफीने 2 बळी घेतले. (Michael Bracewell historic Hat trick for New Zealand)

मायकेल ब्रेसवेलचा मोठा विक्रम…

न्यूझीलंडचा अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलने (Michael Bracewell) आयर्लंडच्या संघाला खिंडार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आयर्लंडची धावसंख्या 13 षटकांत 7 गडी बाद 86 असताना कर्णधार मिचेल सँटनरने ब्रेसवेलला गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला. ब्रेसवेलच्या पहिल्याच चेंडूवर मॅकार्थीने चौकार मारला आणि पुढच्या चेंडूवर धाव घेतली. यानंतर स्ट्राईकवर आलेला मार्क अडायर डीप मिड-विकेटच्या दिशेने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात वैयक्तिक 27 धावांवर बाद झाला. यानंतर ब्रेसवेलने स्ट्राइकवर आलेल्या मॅकार्थीचा बदला घेत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या विकेटसह ब्रेसवेलने हॅट्ट्रिक गाठली होती. अखेर ब्रेसवेलने क्रेग यंगला बाद करून आपल्या पहिल्याच टी 20 षटकात हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि यजमान आयर्लंड संघाला पराभवाची धूळ चारली.

टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेणारा ब्रेसवेल पहिला खेळाडू ठरला. एवढेच नाही तर टी-20 मध्ये हॅटट्रिक घेणारा तो न्यूझीलंडचा तिसरा खेळाडू आहे. त्यांच्याआधी जेकब ओरम आणि टीम साऊदी यांनी ब्लॅककॅप्ससाठी हा पराक्रम केला आहे. ओरमने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध तर साऊदीने 2010 मध्ये पाकिस्तानविरुद्ध या फॉरमॅटमध्ये हॅट्ट्रिक केली होती.

मायकेल ब्रेसवेल कोण आहे?

मायकेल ब्रेसवेल हा न्यूझीलंडच्या वेलिंग्टन संघाकडून खेळतो. त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1991 रोजी झाला. तो माजी कसोटीपटू ब्रेंडन आणि जॉन ब्रेसवेल यांचा पुतण्या आणि सध्याचा आंतरराष्ट्रीय खेळाडू डग ब्रेसवेलचा चुलत भाऊ आहे. मार्च 2022 मध्ये त्याने न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात इतिहास रचत त्याने शेवटच्या षटकात 20 पेक्षा जास्त धावा केल्या आणि किवी संघाला एक विकेटने विजय मिळवून दिला. त्याचवेळी त्याने आपल्या टी-20 कारकिर्दीतील पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेतली.

Back to top button