Closing Bell | बाजारात पडझड, सेन्सेक्स ५५१ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना २.६ लाख कोटींचा फटका

Closing Bell | बाजारात पडझड, सेन्सेक्स ५५१ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना २.६ लाख कोटींचा फटका

पुढारी ऑनलाईन : मध्य पूर्वेतील इस्रायल-हमास यांच्यातील तीव्र संघर्ष आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या शक्यतेने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. या कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात पडझड झाली. आज सेन्सेक्स ५५१ अंकांनी घसरून ६५,८७७ पर्यंत खाली आला. तर निफ्टी १४० अंकांच्या घसरणीसह १९,६७१ वर बंद झाला. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या

आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे २.६ लाख कोटींचा फटका बसला. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.५९ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ३२१.२३ लाख कोटी रुपयांवर आले. याआधीच्या सत्रात ते ३२३.८२ लाख कोटी होते. एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या आघाडीच्या शेअर्समध्ये आज घसरण झाली.

क्षेत्रीय पातळीवर निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस, निफ्टी बँक हे घसरले. तर आयटी, मीडिया, मेटल, फार्मा, हेल्थकेअर, ऑईल आणि गॅस हे वधारले. याधीच्या सत्रात मंग‍ळवारी तैजीचा माहौल परतला होता. पण आज बुधवारी (दि. १८ ऑक्टोबर) ऑटो आणि फार्मा वगळता सर्व क्षेत्रांमध्ये विक्रीचा मारा दिसून आला. यामुळे बाजार पुन्हा दबावाखाली आला.

ऑटो आणि फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले. पॉवर, आयटी, ऑईल आणि गॅस, मेटल, रियल्टी आणि बँक प्रत्येकी ०.५-१ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.८ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी घसरला.

सेन्सेक्स आज ६६,४७३ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,८४२ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, रिलायन्स, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, कोटक बँक, जेएसडब्ल्यू स्टील हे १ ते ३ टक्क्यांदरम्यान घसरले. तर केवळ टाटा मोटर्स, सन फार्मा, मारुती हे शेअर्स वाढले.

जागतिक बाजारातील स्थिती काय?

चीनमधील आर्थिक सुधारणांच्या संकेतांमुळे आशियाई बाजारात आज संमिश्र परिस्थिती दिसून आली. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक (Japan's Nikkei 225) ०.१८ टक्के आणि चीनचा शांघाय कंपोझिट ०.६ टक्क्यांनी खाली आला. तर कोरियाचा कोस्पी ०.१४ टक्क्यांनी वाढला. तर अमेरिकेतील निर्देशांक मंगळवारी सपाट पातळीवर बंद झाले होते. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) ३३,९९७ वर स्थिरावला. तर एस अँड पी ५०० निर्देशांकही सपाट झाला. नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq Composite) ०.३ टक्के वाढून १३,५३३ वर बंद झाला होता. (Stock Market Closing Bell)

परदेशी गुंतवणूकदार

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) मंगळवारी २६४ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स खरेदी केले. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ११३ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news