‘एसडब्ल्यूपी’ : दरमहा मिळते खात्रीशीर उत्पन्न, जाणून घ्या त्याविषयी

‘एसडब्ल्यूपी’ : दरमहा मिळते खात्रीशीर उत्पन्न, जाणून घ्या त्याविषयी

प्रत्येकाला आपले आयुष्य सुखात जावे असे वाटत असते. विशेषतः जसे निवृत्तीपूर्वी जगत होतो तसेच निवृत्तीनंतर जगण्यास मिळाले तर बरे होईल, असे वाटणेही स्वाभाविकच म्हणावे लागेल. निवृत्तीनंतरचे जीवन कोणत्याही तणावाशिवाय सुरळीतपणे पार पडावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण त्यासाठी नोकरी वा व्यवसाय करत असतानाच नियमित बचतीची सवय लावून घेतली पाहिजे, तीही तरुणपणातच. अन्यथा तहान लागल्यावर विहीर खणायची वेळ आल्यास आयुष्य निवृत्तीनंतर कष्टप्रद होऊ शकते.

सरकारने सरकारी नोकर्‍यांतून पेन्शन 2005 सालानंतर रद्द केली आहे किंवा जी आहे ती तुटपुंजी आहे. खासगी कंपन्यांतून पेन्शन मिळेल याची खात्री नाही. म्हणूनच प्रत्येकाला आपल्याला निवृत्तीनंतर आयुष्य कसे जगावयाचे आहे, त्याचा विचार करून तरुणपणीच नोकरी वा व्यवसाय करतानाच निवृत्ती वेतनाची सोय करून ठेवणे आवश्यक आहे.

तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी नेहमी पैसे असणे आवश्यक ठरते. म्हणूनच दर महिन्याला उत्पन्नाचा स्रोत कायम राहणे गरजेचे आहे. त्यामुळे जेव्हा आपण नोकरी किंवा व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्यासोबतच आपल्या सेवानिवृत्तीचे नियोजनही केले पाहिजे. दूरद़ृष्टीची माणसे तसे करतातही आणि निवृत्तीनंतर ते आयुष्य आनंदात घालवतात. माझ्या स्वानुभवावरून मी येथे गुंतवणूक आणि निवृत्ती वेतनासंबंधी काही मुद्दे मांडत आहे. त्याचा आजच्या तरुण पिढीला फायदा होईल असे वाटते.

सध्या बँकांच्या किंवा पोस्टाच्या मुदत योजना या कमी व्याजामुळे फायदेशीर ठरत नाहीत. तसेच जीवन विम्यातूनही कमी व्याजामुळे पुरेसे उत्पन्न मिळू शकत नाही किंवा त्यासाठी विम्यात जास्त गुंतवणूक करावी लागते. म्हणून मासिक खर्च भागवण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या वृद्धी (ग्रोथ) पर्यायात गुंतवणूक करून 'सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन' म्हणजेच 'एसडब्ल्यूपी'च्या मदतीने दरमहा उत्पन्न मिळवणे अधिक फायदेशीर ठरते. सध्या हा सगळ्यात कमी जोखमीचा पर्याय आहे.

'सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन' म्हणजे काय?

गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असणार्‍या 'सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' म्हणजेच 'एसआयपी' पद्धतीने गुंतवणूक आपल्या सर्वानाच माहिती आहे. यात आपल्या बँकेतून ठरावीक रक्कम, ठरावीक तारखेला, ठरवलेल्या म्युच्युअल फंड योजनेत जमा होते. त्याचप्रमाणे अगदी उलट म्हणजेच 'एसडब्ल्यूपी'मध्ये ठरवलेल्या म्युच्युअल फंड योजनेतून, ठरावीक रक्कम, ठरावीक तारखेला आपल्या बँकेत जमा होते.

'एसडब्ल्यूपी'ची कार्यपद्धती

'एसआयपी'च्या विरुद्ध कार्यपद्धती एसडब्ल्यूपीची असते. ज्यावेळेस आपल्याला नियमित उत्पन्नाची गरज असते, त्यावेळेस 'एसडब्ल्यूपी'मार्फत आपण दरमहा पैशांचा नियमित स्रोत निर्माण करू शकता. म्हणजेच म्युच्युअल फंडाच्या वृद्धी पर्यायात गुंतवणूक करून दरमहा ठरावीक रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करण्याची सुविधा गुंतवणूकदारांना यामध्ये मिळते. म्युच्युअल फंड कंपनीकडून दरमहा आवश्यक युनिट्सची विक्री करून रक्कम गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

'एसडब्ल्यूपी'चे फायदे

1) दरमहा खात्रीशीर उत्पन्न मिळण्याची हमी.
2) आवश्यकतेनुसार उत्पन्नाची रक्कम ठरवण्याची संधी.
3) कराचा विचार करता, लाभांश पर्यायांपेक्षा अधिक फायदेशीर ठरतो.
'एसडब्ल्यूपी'च्या मर्यादा

1) गुंतवणुकीची मूळ रक्कम कमी वा जास्त फंडातील गुंतवणूक असणार्‍या कंपनीच्या कार्यक्षमतेनुसार होऊ शकते. पण दरमहा युनिटची विक्री करून ठरावीक उत्पन्न देण्यात येते. साहजिकच, जर योग्य नियोजन केलेले नसेल तर गुंतवणुकीची मूळ रक्कम कमी होण्याची शक्यता असते.

2) जर सुरुवातीच्या काळात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली, तर मूळ गुंतवणुकीचे मूल्य खूपच कमी होऊ शकते.
सेवानिवृत्तीनंतर 'एसडब्ल्यूपी'च्या मदतीने नियमित उत्पन्न कसे मिळवाल?

तरुण वयातच समभाग संलग्न म्युच्युअल फंडाच्या वृद्धी पर्यायात नियमित गुंतवणूक करावी. निवृत्तीनंतर 'एसडब्ल्यूपी'च्या मदतीने युनिटची विक्री करून उत्पन्न मिळवावे. सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंडात 'एसआयपी' पद्धतीने गुंतवणूक केल्यास 12 टक्के व्याज मिळते. उदाहरणार्थ,

1) 2023 ते 2043 अशी वीस वर्षे दरमहा 5,000 रुपयांची समभाग संलग्न आधारित म्युच्युअल फंडात (एसआयपी) गुंतवणूक केली, तर 2043 मध्ये गुंतवणुकीचे मूल्य साधारणपणे 12 लाख रुपये असेल. अधिक वीस वर्षे 12 टक्के चक्रवाढ व्याजाने वाढलेली रक्कम मिळवल्यावर तर एकूण रक्कम 50 लाखांपर्यंत जाते. त्यामुळे 2043 सालापासून दरमहा ठरावीक तारखेला सुमारे 32,000 रुपये पुढील 20 वर्षे किंवा सुमारे 29000 रुपये पुढील 25 वर्षे 'सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन' (एसडब्ल्यूपी)च्या साहाय्याने तुमच्या बँक खात्यात जमा होत राहतील.

2) 2023 ते 2038 अशी 15 वर्षे दरमहा 20 हजार रुपयांची समभाग संलग्न आधारित म्युच्युअल फंडात (एसआयपी) गुंतवणूक केली, तर 2038 मध्ये गुंतवणुकीचे मूल्य साधारणपणे 36 लाख रुपये असेल. अधिक वीस वर्षे 12 टक्के चक्रवाढ व्याजाने वाढलेली रक्कम मिळवल्यावर तर एकूण रक्कम 1 कोटी रुपयांपर्यंत जाते. परिणामी, 2038 सालापासून दरमहा ठरावीक तारखेला सुमारे 67,000 रुपये पुढील 20 वर्षे सुमारे 60,000 रुपये पुढील 25 वर्षे 'सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन'च्या (एसडब्ल्यूपी) साहाय्याने बँक खात्यात जमा होत राहतील.

3) एक रकमी 6 लाख रुपये म्युच्युअल फंडात गुंतवले तर दरमहा 5 हजार रुपये उत्पन्न सुरू होते. नोकरी वा व्यवसाय करत असताना पन्नाशीनंतर जीवनात स्थैर्य प्राप्त झाल्यावर अशा प्रकारे दरवर्षी जर सहा लाख रुपये गुंतवणूक केली तर आपल्या निवृत्ती वेतनात सतत वाढ होत राहील.

थोडक्यात, महागाईवाढ लक्षात घेऊन 'सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल'च्या रकमेत वार्षिक आढावा घेऊन निवृत्तीच्या रकमेत वाढ करता येईल.
दर 2-3 वर्षांनी आर्थिक सल्लगारासोबत चर्चा करून 'सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल'ची रक्कम वाढवावी. म्युच्युअल फंडाची लाभांश योजना आणि 'एसडब्लूपी' या दोन्ही पर्यायात फायदे तसेच काही मर्यादा आहेत. असे असले तरीही तज्ज्ञांच्या मदतीने योग्य नियोजन करून 'एसडब्लूपी'च्या मदतीने निश्चित आर्थिक उत्पन्न मिळवणे अधिक फायदेशीर ठरते, हे आता आपल्या लक्षात आले असेलच.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news