पुढारी ऑनलाईन डेस्क : "विधान भवन परिसरात "शाईच्या पेनाला" बंदी मात्र सिगारेट ओढायला खुली परवानगी. विधान भवन परिसरातील आणखी एक पराक्रम" असं लिहित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी 'गरमा गरम हिवाळी अधिवेशन' असा हॅशटॅग देत आणखी एक व्हिडिओ (Maharashtra Winter Session) शेअर केला आहे.
राज्य विधीमंडळाच अधिवेशन सोमवारपासून (दि.१९) नागपूरमध्ये सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून हे अधिवेशन चर्चेत आहे. आमदार निवासस्थानातील स्वच्छतेसंदर्भात दोन व्हिडिओ समोर आले. हे व्हिडिओ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शेअर केले होते. त्यातील एक व्हिडिओ हा नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृहातील होता. हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था." असं ट्विट करत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ आमदार निवासस्थानातील नाही असं त्यानंतर बांधकाम खात्याने खुलासा केला. यावरुन वाद सुरु असतानाचा त्यांनी आणखी एक ५ सेकंदाचा व्हिडिओ शेअर करत अधिवेशन परिसरातील व्यवस्थेवर निशाणा साधला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या विधानभवन परिसरात राज्य सरकारकडून शाई पेनावर बंदी घालण्यात आली आहे. याचा संदर्भ देत अमोल मिटकरी यांनी ५ सेंकदाचा शेअर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती पुरुष प्रसाधनगृहाजवळ सिगारेट ओढताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी "विधान भवन परिसरात "शाईच्या पेनाला" बंदी मात्र सिगारेट ओढायला खुली परवानगी. विधान भवन परिसरातील आणखी एक पराक्रम. (माहितीसाठी)" असं लिहित 'गरमा गरम हिवाळी अधिवेशन' असा हॅशटॅग दिला आहे.
हेही वाचा