Spirit Of Cricket : नेपाळी विकेटकिपरच्या उदार मनाला क्रिकेट जगताने ठोकला सलाम (video)

Spirit Of Cricket : नेपाळी विकेटकिपरच्या उदार मनाला क्रिकेट जगताने ठोकला सलाम (video)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : असं म्हणतात की क्रिकेट हा जंटलमन (Gentleman) लोकांचा खेळ ( Spirit Of Cricket ) समजला जातो. पण, आजकालचे क्रिकेट पाहिले की फक्त एकमेकांना स्लेजिंग ( sledging) करणे, खुन्नस देणे, बाचाबाची आणि वाद हा या खेळाचाच भाग असल्याचे वाटू लागले आहे. असे असले तरी कधी कधी असे काही वेगळे क्षण क्रिकेटच्या मैदानावर पहायला मिळतात जे आपणास अचंबित करुन टाकतात.

टी-२० वर्ल्ड कपमधील इंग्लड विरुद्धच्या सामन्यात डॅरेल मिशेल याने दाखवलेल्या वर्तवणुकीची दखल घेत त्याची स्तुती करत त्याला स्पिरीट ऑफ क्रिकेट या सन्मानाने गौरविण्यात आले. आता असे काही क्रिकेटच्या मैदानावर घडले आहे की, प्रत्येक क्रिकेट रसिकांना असे वाटेल की यंदाचा 'स्पिरीट ऑफ क्रिकेट' ( Spirit Of Cricket ) हा सन्मान याच खेळाडूला दिला जाईल. पण, नेमके असे काय घडले आहे?

आर्यलँड आणि नेपाळ यांच्यामध्ये १४ फेब्रुवारी रोजी टी-२० सामना खेळविण्यात आला. या सामन्यात विकेटकीपर फलंदाज असणाऱ्या नेपाळचा आसिफ शेख या खेळाडूचे वर्तवणूक ( Spirit Of Cricket ) पाहून सारेजण त्याला सलाम ठोकत आहेत. यामध्ये माजी दिग्गज क्रिकेटपटूंचा सुद्धा समावेश आहे.

त्याचं असं की, १९ व्या षटकात आर्यलँडचे फलंदाज मार्क ॲडायर आणि अँडी मॅकब्राइन हे खेळपट्टीवर होते. नेपाळचा गोलंदाज कमल सिंह याने षटकातील तिसरा चेंडू टाकला. मार्क ॲडायर मोठा फटका मारायल गेला पण, तो फटका न बसता चेंडू खेळपट्टीच्या जवळच पडला. यावेळी दुसऱ्या बाजूला असणारा फलंदाज अँडी मॅकब्राइन धाव घेण्यासाठी पळाला. तेव्हाच चेंडू पकडण्यासाठी गोलंदाज कमल सिंह चेंडूकडे धावला. यादरम्यान अँडी मॅकब्राईन आणि कमल सिंह हे एकमेकांना धकडले. यामुळे अँडी मॅकब्राईन हा धावपट्टीच्या मध्यातच पडला. तो उठून पुन्हा धावू लागला पण, तो पर्यंत उशिर झाला होता. कारण, मॅकब्राईन उठे पर्यंत कमल सिंह चेंडूपर्यंत पोहचला व त्याने चेंडू यष्टीरक्षक आसिफ शेखकडे फेकला. अँडी मॅकब्राईन क्रिझमध्ये पोहचेपर्यंत आसिफच्या हातात चेंडू आला होता. पण, आसिफ शेख याने चेंडूने यष्टी उडवून अँडी मॅकब्राईनला बाद केले नाही. तर त्याने हातातच चेंडू धरुन ठेवला व अँडी मॅकब्राईनला त्याची धाव पूर्ण करण्याची संधी देत त्याला जीवदान दिले.

यष्टीरक्षक आसिफ शेखच्या ही उदारता पाहून सारेच अवाक झाले. अँडी मॅकब्राईनला बाद करण्याची नामी संधी आसिफकडे होती पण त्याने तसे केले नाही. गोलंदाज कमल सिंह याच्यामुळे अँडी हा धावपट्टीवर कोसळला व पुन्हा उठून धावू लागला. त्यांची धडक झाली नसती तर अँडीने आरामात धाव पूर्ण केली असती. आसिफने खेळवृत्तीची निवड करत चांगल्या भावनेने अँडीला बाद केले नाही. खेळ हे संपूर्ण जगात किंवा एकमेकांच्यात चांगली भावना निर्माण होण्यासाठी, एकमेकांमध्ये खेळवृत्ती वाढविण्यासाठीच खेळवले जातात. पण आजकाल ही भावना वाढीस लागण्या ऐवजी आपण एकमेकांच्या समोर उभे ठाकतो व दुरावतो. आसिफ शेख याने नेमका हाच खेळातील अर्थ त्याच्या कृतीतून पुन्हा एकदा जगाला दाखवून दिला आहे. तसेच याच भावनेसाठी खेळ हा खेळला गेला पाहिजे.

आसिफ शेखच्या कृतीचे, त्याने दाखवलेल्या उदारतेचे, खेळावृत्तीचे सर्वस्तरातूनच कौतुक होत आहे. नेमके हेच 'स्पिरीट ऑफ गेम' आणि 'स्पिरीट ऑफ क्रिकेट' आहे (Spirit Of Cricket). सध्याचे क्रिकेट पाहताना या भावनेचा अभाव नक्कीच जाणवतो. पण, या दुबळ्या संघातील खेळाडुंनी क्रिकेटच्या अव्वलस्थानी असणाऱ्या संघाना व खेळाडुंना एक आदर्शच घालून दिला आहे आणि त्याचे कौतुक होणे गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news