शालेय अभ्यासक्रमात शिकवली जाणार भगवद्गीता; गुजरात सरकारचा मोठा निर्णय

शालेय अभ्यासक्रमात शिकवली जाणार भगवद्गीता; गुजरात सरकारचा मोठा निर्णय

अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन

विधानसभा निवडणुकीआधी गुजरात सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. गुजरात सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शाळेत विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता (Shrimad Bhagavad Gita) शिकवण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या टप्प्यात ६ वी ते १२ वी पर्यंतच्या मुलांना भगवद्गीतेतील श्लोक आणि सार समजून सांगितले जाणार आहे. याबाबतची माहिती गुरुवारी राज्य सरकारकडून जारी केलेल्या परिपत्रकातून देण्यात आलीय. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील सर्व शाळकरी मुलांना भगवद्गीतेमधील तत्त्वे आणि मूल्ये शिकवली जाणार आहेत. त्याचसोबत पहिली आणि दुसरीच्या वर्गासाठी इंग्रजी विषय सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. जेणेकरुन मुलांना सुरुवातीपासूनच गुजराती भाषेव्यतिरिक्त इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व मिळवता येईल.

२०२२-२३ पासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमात भारतीय संस्कृती आणि ज्ञान प्रणालीचा समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने केली होती. पहिल्या टप्प्यात भगवद्गीतेतील तत्त्वे आणि मूल्ये ६ ते १२ वी पर्यंतच्या मुलांना त्यांची समज आणि आवडीनुसार शिकवली जावीत. वर्गात भगवद् गीतेची ओळख करुन देणे. ९ ते १२ वी पर्यंतच्या मुलांना भगवद् गीता कथा आणि धड्याच्या स्वरूपात शिकवावी. प्रार्थनेत श्रीमद्भगवद्गीतेमधील श्लोकांचे पठण करावे. शाळेत भगवद्गीतेवर श्लोक ज्ञान, श्लोकपूर्ती, निबंध, नाटक, चित्रकला, प्रश्नमंजुषा अशा स्पर्धाही घेण्यात याव्यात. ६ ते १२ पर्यंतच्या मुलांना अभ्यास साहित्य मुद्रित, दृकश्राव्य आदी माध्यमातून पुरवले जावे, अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या.

श्रीमद्भगवद्गीतेचे ज्ञान देण्याचे कारण काय?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शिक्षण प्रणाली आणि शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन करणारी मूलभूत तत्त्वे तयार केली आहेत. विद्यार्थ्यांना भारताची समृद्धी, वैविध्यपूर्ण, प्राचीन आणि आधुनिक संस्कृती तसेच ज्ञान प्रणाली सोबतच भारताच्या परंपरांशी जोडण्याचा प्रयत्न करण्याचा उद्देश आहे. यासाठी भारतीय संस्कृतीच्या माहितीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केला जात असल्याचे सांगण्यात आले होते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भारतात स्त्रियांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज : डॉ. निहारिका प्रभू | #SkinCareTreatment

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news