Closing Bell | सेन्सेक्स २४० अंकांनी वाढून बंद, IT, मेटल स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी, जाणून घ्या आजचे मार्केट

Closing Bell | सेन्सेक्स २४० अंकांनी वाढून बंद, IT, मेटल स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी, जाणून घ्या आजचे मार्केट

पुढारी ऑनलाईन : सकारात्मक जागतिक संकेतांचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी आज सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात वाढून बंद झाले. सेन्सेक्स २४० अंकांनी वाढून ६५,६२८ वर बंद झाला. तर निफ्टी ९३ अंकांच्या वाढीसह १९,५२८ वर स्थिरावला. आज आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी बाजारात चौफेर खरेदी दिसून आली. पॉवर, मेटल, ऑटो, रियल्टी, ऑइल अँड गॅस आणि पीएसयू बँक १ ते २.८ टक्क्यांच्या दरम्यान वाढून बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्याने वाढले. विशेषतः मेटल शेअर्समधील तेजीने बाजारात उत्साह राहिला.

आयटी शेअर्स तेजीत

सेन्सेक्स आज ६५,५२५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,६६८ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर विप्रो, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचसीएल टेक हे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक वाढले. तर टेक महिंद्रा, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, टीसीएस, एसबीआय हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. जेएसडब्ल्यू, एलटी, एचडीएफसी बँक हे शेअर्सही वधारले होते. ॲक्सिस बँक, एम अँड एम, एशियन पेंट्स, आयटीसी, नेस्ले इंडिया, कोटक बँक हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर कोल इंडिया, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, एचसीएल टेक हे शेअर्स वाढले. तर एम अँड एम, ॲक्सिस बँक, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स हे घसरले होते.

जिओ फायनान्शिअल ९ टक्क्यांपर्यंत वाढला

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस (जेएफएसएल) चे शेअर्स सोमवारी ९ टक्क्यांपर्यंत वाढले. हा शेअर आज बीएसईवर २६७ रुपयांवर आणि एनएसईवर २६६ रुपयांवर पोहोचला. हा शेअर (Jio Financial Services) बीएसईवर २६५ रुपयांवर आणि एनएसईवर २६२ रुपयांवर लिस्ट झाला होता.

आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअर्सचीही उसळी

अमेरिकेतील GQG पार्टनर्सनी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात डीलद्वारे आयडीएफसी फर्स्ट बँकेतील भागभांडवल खरेदी केल्यानंतर बीएसईवरील सोमवारच्या व्यवहारात आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शेअर्स (IDFC First Bank Share Price) ५ टक्क्यांनी वाढून ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ९८ रुपयांवर पोहोचले.

आशियाई बाजारात तेजी

अमेरिकेसह आज आशियाई बाजारात तेजी राहिली. जपानचा निक्केई निर्देशांक २२८ अंकांनी वाढून ३२,९३९ वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक १ टक्के वाढीसह २,३७३ वर गेला.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news