आयकर : इन्कम टॅक्स पेमेंटमध्ये चूक झाली आहे का?, जाणून घ्या ‘चालान करेक्शन’ प्रक्रियेविषयी | पुढारी

आयकर : इन्कम टॅक्स पेमेंटमध्ये चूक झाली आहे का?, जाणून घ्या 'चालान करेक्शन' प्रक्रियेविषयी

सुभाष वैद्य

प्राप्तिकर खात्याने एक ऑनलाईन ‘चालान करेक्शन सिस्टिम’ सुरू केली आहे. ही सुविधा कर भरणार्‍या लोकांसाठी उपयुक्त आहे. कर भरणा करताना एखादी चूक झाली असेल, तर त्याला दुरुस्त करण्यासाठी बराच वेळ जातो.

सुरुवातीच्या काळात बहुतांश लोकांना इन्कम टॅक्स पेमेंट चलन मिळवणे खूप अडचण येत असे. पण आता हा काळ गेला आहे. यामागचे कारण म्हणजे त्याची प्रक्रिया खूपच दीर्घकाळ चालायची आणि ती किचकटही होती. आता प्राप्तिकर खात्याने एक ऑनलाईन चालान करेक्शन सिस्टिम सुरू केली आहे. कर भरणार्‍या मंडळींसाठी उपयुक्त असून, एक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण नवीन सुविधा आहे. टॅक्स पेमेंटमध्ये एखादी चूक होत असेल, तर त्याला दुरुस्त करण्यासाठी बराच काळ जायचा. करदात्यांना इंडेमनिटी बाँड्ससह अनेक प्रकारचे पेपर आणि अर्ज भरून द्यावे लागायचे. अर्थात, चलन भरताना झालेली चूक प्राप्तिकर अधिकार्‍याला सांगण्याचा हा एक मार्ग होता. करदात्याने टॅक्स पेमेंटचा दुहेरी लाभ घेतलेला नाही, हे सांगणे यामागचा हेतू असतो.

या नव्या फीचरचे नाव चालान करेक्शन असे आहे. हे फीचर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फायलिंग पोर्टलवर आहे. टॅक्सपेयर्स मंडळींकडून ऑनलाईन टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी या पोर्टलचा वापर केला जातो. चालान करेक्शन हे टॅक्सपेयर्सला टॅक्स पेमेंट डिटेल देताना झालेली चूक दुरुस्त करण्याची सुविधा देते. या अनुसार पुढची प्रक्रिया करून त्याची दुरुस्ती केली जाते.

1) असेसमेंट इअरमध्ये बदल.
2) टॅक्सचे प्रकार (मायनर हेड्स) जसे अ‍ॅडव्हान्स टॅक्स (100), सेल्फ असेसमेंट टॅक्स (300) आणि डिमांड पेमेंट आणि रेग्युलर असेमेंट टॅक्स (400) मध्ये बदल.
3) इन्कम टॅक्स ऑन कंपनीज (0020) आणि इन्कम टॅक्स अदर देन कंपनी (0021) सारख्या मेजर हेड्समधील बदल.

आता हे फीचर 2020-21 नंतरच्या टॅक्ससाठी उपलब्ध झाले आहे. यानुसार केवळ वर सांगितल्याप्रमाणे सध्या मायनर कोड्स उपलब्ध आहेत. अन्य कोणतेही करेक्शन करण्यासाठी आपल्याला जुन्याच प्रक्रियेचा वापर करावा लागेल. आपल्याला पेमेटनंतर सात दिवसांच्या आत बँकेशी संपर्क साधावा लागेल किंवा संबंधित ज्युरिडिक्शनच्या असेसमेंट अधिकार्‍यांकडे जावे लागेल.

हे बदल स्वागतार्ह आहेत. यावरून करदात्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्राप्तिकर खाते प्रयत्नशील असून, त्याचाच एक भाग म्हणून या फीचरकडे पाहता येईल. हे नवीन चालान करेक्शन फीचर किरकोळ चुका दुरुस्त करण्यासाठी उपयुक्त आहे. यात सिलेक्शन ऑफ टाइप ऑफ टॅक्स किंवा असेसमेंट इअरची निवड करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. हे खूपच किरकोळ मुद्दे आहेत. विशेषत: काही नव्या करदात्यांना या फीचरसोबतही अडचणी येऊ शकतात कारण त्यांना प्राप्तिकर खात्याकडून वापरण्यात येणार्‍या तंत्रज्ञानाची माहिती असेलच असे नाही.

Back to top button