Share Market Closing Bell |सेन्सेक्स, निफ्टीचा विक्रमी उच्चांकानंतर यू-टर्न?, बाजारात नफावसुलीचा सपाटा, आज नेमकं काय घडलं?

Share Market Closing Bell |सेन्सेक्स, निफ्टीचा विक्रमी उच्चांकानंतर यू-टर्न?, बाजारात नफावसुलीचा सपाटा, आज नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज बुधवारी नवा विक्रमी उच्चांकानंतर नफावसुलीचा सपाटा दिसून आला. यामुळे सुरुवातीला ४०० अंकांनी वाढलेला सेन्सेक्स आजच्या ट्रेडिंग सत्रात १ हजार अंकांनी खाली आला. त्यानंतर सेन्सेक्स ९३० अंकांनी घसरून ७०,५०६ वर बंद झाला. तर निफ्टी ३०२ अंकांनी खाली येऊन २१,१५० वर स्थिरावला. शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यामुळे सेन्सेक्स १.५० टक्के आणि निफ्टी १.६० टक्क्यांनी खाली आला. जागतिक बाजारातील मूड उत्साही असतानाही आज बाजारात विक्री झाली. आयटी आणि एफएमसीजी निर्देशांक वगळता सर्व क्षेत्रांमधील व्यवहारात घट दिसून आली. (Share Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

नफावसुलीचा सपाटा

सेन्सेक्स आज ७२ हजारांच्या जवळ गेला होता. नवीन विक्रमी शिखर गाठल्यानंतर सेन्सेक्स १ हजार अंकांनी खाली आला. तर निफ्टीदेखील शिखरावरून जवळपास ३०० अंकांनी खाली आला. कारण ट्रेडर्सनी नफा वसुली करणे पसंत केले. ऑटो, मेटल, मीडिया, पीएसयू बँक आणि रियल्टी स्टॉक्समध्ये सर्वांधिक विक्री झाली.

सेन्सेक्स आज ७१,६४७ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१,९१३ पर्यंत गेला. पण त्यानंतर तो ७०,३०० पर्यंत खाली आला. आज सर्व शेअर्स लाल चिन्हात बंद झाले. टाटा स्टील, एम अँड एम, टाटा मोटर्स हे सुमारे ३ टक्क्यांनी खाली घसरले. एनटीपीसी, एसबीआय, एचसीएल टेक, पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील हेही २ टक्क्यांनी खाली आले.

निफ्टीवर अदानींचे शेअर्स टॉप लूजर्स

निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅपमध्ये अधिक घसरण दिसून आली. हे निर्देशांक प्रत्येकी सुमारे २ टक्क्यांनी घसरले. क्षेत्रीय पातळीवर केवळ एफएमसीजीने हिरव्या चिन्हात व्यवहार केला. बँका आणि आयटी निर्देशांक घसरले. ऑटो, मीडिया, मेटल, पीएसयू बँका आणि रिअल्टी स्टॉक्सध्ये ही घसरण तीव्र होती.

निफ्टी ५० वर अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक घसरले. अदानी पोर्ट्सचा शेअर १,०७८ रुपयांवर खुला झाला होता. त्यानंतर हा शेअर १,०८३ रुपयांपर्यंत वाढला. त्यानंतर तो ४ टक्के घसरणीसह १,०२७ रुपयांपर्यंत खाली आला. अदानी एंटरप्रायजेसचा शेअर २,९४६ रुपयांवर खुला झाला. त्यानंतर हा शेअर २,८१६ रुपयांपर्यंत खाली आला. यूपीएल, कोल इंडिया, टाटा स्टील हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी घसरले. दरम्यान, निफ्टीवर ओएनजीसी, टाटा कन्झूमर, ब्रिटानिया, हिरो मोटोकॉर्प हे शेअर्स तेजीत राहिले.

मजबूत जागतिक संकेतांमुळे सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ४०० अंकांनी वाढून ७१,८४० चा टप्पा पार केला होता. सेन्सेक्सचा हा नवा विक्रमी उच्चांक होता. तर निफ्टी ११३ अंकांनी वाढून २१,५६६ वर पोहोचला होता. देशांतर्गत मजबूत मॅक्रो इकॉनॉमिक डेटा, तेलाच्या किमतीत घसरण, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांकडून सतत होणारा ओघ, परकीय गुंतवणूकदारांकडून खरेदी आणि अमेरिकेचा व्याजदराबाबतचा सुधारीत दृष्टीकोन यामुळे शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या वाढीला सपोर्ट मिळाला होता. (Share Market Closing Bell) पण ही विक्रमी तेजी अधिक वेळ टिकून राहिली नाही.

परदेशी गुंतवणूकदार

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) मंगळवारी ६०१ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) २९४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news