Stock Market Closing Bell | बाजारात चौफेर खरेदी! सेन्सेक्स ६०० अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांना ३.४५ लाख कोटींची लॉटरी

Stock Market Closing Bell | बाजारात चौफेर खरेदी! सेन्सेक्स ६०० अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांना ३.४५ लाख कोटींची लॉटरी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील तेजीनंतर आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकांनी उच्चांकी पातळीवर व्यवहार केला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) ६०० अंकांनी वाढून ६६,१२१ वर पोहोचला. तर निफ्टी ५० (Nifty) निर्देशांक १९० अंकांनी वाढून १९,७०० वर राहिला. त्यानंतर सेन्सेक्स ५६६ अंकांच्या वाढीसह ६६,०७९ वर बंद झाला. तर निफ्टी १७७ अंकांनी वाढून १९,६८९ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात (BSE m-cap) ३.४५ लाख कोटींनी वाढ होऊन ते ३१९.६३ लाख कोटींवर पोहोचले. काल बाजार भांडवल ३१६.१८ लाख कोटी होते. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) या हेवीवेट्समधील खरेदीमुळे निर्देशांक उंचावले.

संबंधित बातम्या 

सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या चिन्हात बंद झाले. रिअल्टी निर्देशांक ४ टक्क्यांनी वाढला. तर आयटी, पॉवर, ऑटो, मेटल आणि PSU बँक प्रत्येकी १-२ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्याने वाढले. आज सर्व क्षेत्रात चौफेर खरेदी दिसून आली.

यूएस बाँडचे उत्पन्न घसरल्याने आणि कच्च्या तेलाचे दर स्थिर झाल्यामुळे तसेच जागतिक बाजारपेठेत सुधारणा झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारासाठी तेजी परतली आहे. बाजारातील तेजीत हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय आघाडीवर राहिले. आज बँका, फायनान्सियल, ऑटोमोबाईल, मेटस आणि रिअल इस्टेट स्टॉकमधील नफ्यामुळे बाजाराला सपोर्ट मिळाला.

सेन्सेक्स आज ६५,६६२ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६,१८० पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर भारतीय एअरटेल, टाटा मोटर्स, कोटक बँक, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी वाढले. तसेच ॲक्सिस बँक, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा स्टील, मारुती, एसबीआय, आयटीसी, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक हे शेअर्स १ टक्क्यांनी वाढले. बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, एनटीपीसी, रिलायन्स, एचडीएफसी बँक हे शेअर्सदेखील हिरव्या चिन्हात व्यवहार केला. दरम्यान, इंडसइंड बँक, टीसीएस या शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली.

माझगांव डॉक शिपबिल्डर्सने बहुउद्देशीय हायब्रीड पॉवर वेसल्सच्या बांधकामासाठी युरोपियन क्लायंटसोबत लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरी केल्यावर त्यांचे शेअर्स (Mazagon Dock Shipbuilders Share Price) सुरुवातीच्या व्यवहारात ७ टक्क्यांनी वाढले. त्यानंतर हा शेअर सुमारे ५ टक्के वाढीसह २,१७४ रुपयांवर आला. (Stock Market Closing Bell)

आशियाई बाजारात तेजी

अमेरिकेच्या बाजारातील तेजीनंतर मंगळवारी आशियाई बाजारातही (Asian shares) सकारात्मक वातावरण राहिले. MSCI चा जपानबाहेरील एशिया पॅसिफिक स्टॉक्स १.२ टक्क्यांनी वाढला. जपानचा बेंचमार्क निक्केई निर्देशांक (Japan's benchmark Nikkei) सरासरी २.४ टक्क्यांनी वधारला. अमेरिकेतील शेअर बाजार सोमवारी वाढत्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे वधारून बंद झाला.

FII कडून विक्रीचा सिलसिला कायम

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) सोमवारी सलग १४ व्या सत्रात त्यांच्या विक्रीचा सिलसिला कायम ठेवला. त्यांनी सोमवारी एकूण ९९८ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) २,६६१ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. (FII data)

तेलाच्या किमती

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे पुरवठा खंडित होण्याच्या संभाव्य शक्यतेने मागील सत्रात कच्च्या तेलाचे दर (Oil prices) ४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढले होते. पण मंगळवारी तेलाच्या किमती किंचित खाली आल्या. ब्रेंट क्रूड आज ५६ सेंट्स म्हणजेच ०.६ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ८७.५९ डॉलरवर आले. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ५६ सेंट्स म्हणजेच ०.६ टक्क्यांनी कमी होऊन प्रति बॅरल ८५.८२ डॉलरपर्यंत खाली आले.

भारतीय रुपया

आज भारतीय रुपया प्रति डॉलर ८३.२५ वर स्थिरावला. सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया (Indian rupee) ४ पैशांनी वाढून प्रति डॉलर ८३.२३ वर पोहोचला होता. सहा प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलर निर्देशांक ०.०२ टक्क्यांनी घसरून १०६.०६ वर आला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news