Nashik School Reopen : १३ तारखेपासून सुरू होणार नाशिकमधील शाळा

Nashik School Reopen : १३ तारखेपासून सुरू होणार नाशिकमधील शाळा

नाशिक, पुढारी वृत्तसेवा

शहरातील महापालिकेसह अनुदानित व विनाअनुदानीत खासगी प्राथमिक शाळा इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग येत्या सोमवारपासून (दि.१३) सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला आहे. मनपा शिक्षण विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी ६० टक्के पालकांनी संमतीपत्रक सादर केले आहे. (Nashik School Reopen)

कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरल्याने राज्य शासनाने बहुतांश सर्वच निर्बंध हटवून अनेक व्यवहार पूर्ववत केले आहेत. व्यवहार योग्य रितीने सुरू रहावे आणि पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना मास्क वापरणे, वारंवार हात स्वच्छ धुणे व सामासिक अंतर राखणे या त्रिसूत्रींचे पालन करण्याबाबत बंधने लागू करण्यात आलेली आहे.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात शहरासह ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १० वी तसेच कॉलेज सुरू करण्यात आले तर ग्रामीण भागात ५ वी ते १० आणि कॉलेजमधील अध्यापन सुरू केले होते. (Nashik School Reopen)

यानंतर शासनाने प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला. १ डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणीही होणार होती परंतु, कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंट मुळे शाळांचा निर्णय १० डिेसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला होता.

ज्या – त्या ठिकाणची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शासनाने मनपा आयुक्त तसेच जिल्हा प्रशासनावर सोपविला होता. त्यानुसार मनपा प्रशासनाने शिक्षण विभागाकडून अहवाल मागविला होता.

त्यानुसार आयुक्तांकडे दोन दिवसांपूर्वीच अहवाल सादर झाल्याने मनपा आयुक्त जाधव यांनी येत्या सोमवारपासून (दि.१३) शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर आपली मुले शाळा पाठवण्यास केवळ ६० टक्के पालकांनीच संमती दर्शविली आहे.

कोरोनाच्या नव्या विषाणूची पालक आणि नागरिकांमध्ये भिती निर्माण झाल्याने ४० टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील ३०९ पैकी २९५ शाळांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण पूर्ण झाले असून, या सर्व शाळांमध्ये हॅण्डवॉश आणि तापमापक व सॅनिटायझर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. (Nashik School Reopen)

सर्वच मनपा व खासगी शाळांच्या दर्शनी भागात प्रतिबंधक मार्गदर्शक सूचना प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. शाळेतील विद्यार्थी संख्येनुसार बैठक व्यवस्था करण्यात आली असून, सर्वच शाळांमध्ये पालक सभा घेऊन कोरोनाविषयक जागृती झाली आहे. ३०९ पैकी २६२ शाळा या आरोग्य केंद्राशी संलग्न करण्यात आल्या आहेत.

शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण

मनपा तसेच खासगी शाळांमधील शिक्षकांची संख्या ४२७३ इतकी असून, त्यापैकी ४२७० इतक्या शिक्षकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. यामुळे शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण झाल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. तसेच कोवीडचा प्रादुर्भाव न झालेल्या शाळांची संख्या २८१ इतकी आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news