खवले नसलेल्या नागाची जागतिक पातळीवर नोंद; युनूस मणेर यांचे योगदान | पुढारी

खवले नसलेल्या नागाची जागतिक पातळीवर नोंद; युनूस मणेर यांचे योगदान

वारणावती; पुढारी वृत्तसेवा: भारतीय नागांमध्ये खवले नसलेला नाग सापडणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. सोलापुरात सापडलेल्या स्केल लेस नागाच्या रुपाने भारतातून प्रथमच अशा सर्पाची जागतिक पातळीवर नोंद (नागाची जागतिक पातळीवर नोंद ) झाली आहे. अशी माहिती जीनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेले सर्पमित्र युनूस मणेर यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना मणेर म्हणाले की, सोलापुरात पहिल्यांदा २०१२ साली स्केल लेस नाग जाम मिल परिसरात सर्पमित्र औदुंबर गेजगे यांना आढळून आला. दुसर्‍यांदा २०२० साली असाच एक नाग मोदी परिसरातील सोनी नगर येथे सर्पमित्र प्रवीण जेऊरे व सिद्धाराम कोळी यांना आढळून आला.

दोन्ही स्केललेस कोब्राच्या शरीरावरील खवले नसल्याने या सापांची संशोधनात्मक नोंद होणे (नागाची जागतिक पातळीवर नोंद ) गरजेचे होते. यासंबंधी संशोधन सोलापूरचे सर्पतज्ञ राहुल शिंदे व सातार्‍याचे सर्पतज्ञ अमित सय्यद यांनी केले असून याची जागतिक पातळीवर नोंद झाली आहे. अशा प्रकारच्या सापाची जागतिक पातळीवर नोंद भारतातून पहिल्यांदाच झाली आहॆ.

या नागावर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू होते. या संशोधनाला आता मूर्त स्वरूप आले असून सोलापूरचे सर्पतज्ञ राहुल शिंदे यांची संशोधनपत्रिका (रिसर्च पेपर) २६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाला आहे.

ही संशोधन पत्रिका रेप्टाईल्स अँड अँफिबीयन्स या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सापांवर ही पहिलीच संशोधन पत्रिका आहे. गेले ६ वर्षे चाललेल्या संशोधनाचे सार्थक या नोंदीमुळे झाले असून या विषयावर अधिक संशोधन करणार असल्याचे सर्पतज्ञ राहुल शिंदे, युनुस मणेर यांनी सांगितले.

या संशोधन प्रत्रिकेसाठी इस्लामपूरचे सर्पमित्र युनूस मणेर, कोल्हापूरचे सर्पमित्र देवेंद्र भोसले यांचेसह सोलापूरचे सर्पमित्र औदुंबर गेजगे, प्रवीण जेऊरे, सिद्धाराम कोळी, निसार नदाफ, यांनी योगदान दिले.

सोलापूर शहरात आढळलेल्या स्केल लेस म्हणजेच, विना खवल्याच्या नागाची अमेरिकेतील रेप्टाईल्स अँड अँफिबीयन्स या जर्नलमध्ये नोंद झाली आहे. देशातील ही पहिलीच नोंद आहे. या संशोधनाला मान्यता मिळाल्यामुळे आमच्या कामाचे सार्थक झाले असून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.
-सर्पमित्र युनूस मणेर

हेही वाचलंच का? 

Back to top button