India @75 : ‘मी एका वादळात शिरत आहे; पत्नीला कळवत यशवंतराव झाले होते भूमिगत

यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या यशवंतराव चव्हाण यांनी खर्‍या अर्थाने महाराष्ट्राची अद्ययावत पायाभरणी केली. एवढेच नव्हे तर स्वातंत्र्य लढ्यामध्येही त्यांनी सर्वस्वाची होळी करून व घरावर तुळशीपत्र ठेवून काम केले होते. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे अनेक किस्से तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. बालपणीची अजाणतेची काही वर्षे सोडली तर समज येण्याच्या वयापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत यशवंतराव चव्हाण जगले ते समाजासाठी आणि राष्ट्रासाठी. १९४२ च्या आंदोलनातील यशवंतरावांच्या धडाडीचे अनेक किस्से आजही सांगितले जातात. त्यावेळी महात्मा गांधींनी 'चले जाव'ची घोषणा केली होती. या दोन शब्दांनी सारा देश पेटून उठला. (India @75)

देशातील तरुण 'करेंगे या मरेंगे' या त्वेषाने लढ्यात उतरला. यशवंतरावांचा त्यावेळी विवाह झाला होता. घरात तरुण पत्नी असताना, नवीन लग्न झालेले असतानाही संसार सुखाकडे त्यांनी पाठ फिरवत आंदोलनात उडी घेतली. 'मी एका वादळात शिरत आहे' असे पत्नीला केवळ पत्र लिहून त्यांनी कळवले. स्वत: भूमिगत झाले.

यशवंतरावांमुळे वेणूताईंना अटक झाली होती. भाऊ गणपतरावांनाही सरकारने ताब्यात घेतले होते. सारे घरच उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. पण यशवंतराव डगमगले नाहीत. अत्यंत धीराने सर्व गोष्टी सहन केल्या व इतरांनाही असे करण्याचे शिकवले. अशा वातावरणात यशवंतरावांनी अनेक मोर्चांचे नेतृत्व केले. अनेक ठिकाणी सभा, बैठका घेतल्या. बर्‍याच योजना आखल्या. रेल्वे स्टेशन जाळणे, तारा तोडणे, पोस्ट कचेर्‍या लुटणे इत्यादी उपक्रम यशवंतरावांनी हाती घेतले आणि सार्‍या मोहिमेचे नेतृत्व त्यांनी स्वत: केले होते.

या स्वातंत्र्यलढ्यात यशवंतरावांनी दाखवलेली जिगर आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी ठरणारी आहे. त्याचबरोबर १९६२ मध्ये जेव्हा चीनने भारतावर हल्ला चढवला त्यावेळी पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना दिल्लीला बोलावून संरक्षणमंत्रीपद बहाल केले. 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला' अशा शब्दांत या घटनेचे वर्णन केले गेले. यशवंतरावांची देशपातळीवरील ही ओळख महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news