India@75 : कराड- झेंडा फडकावणार्‍या यशवंतराव चव्हाण यांना झाली होती कैद | पुढारी

India@75 : कराड- झेंडा फडकावणार्‍या यशवंतराव चव्हाण यांना झाली होती कैद

कराड; पुढारी वृत्तसेवा : सन 1930 साली सविनय कायदेभंग चळवळीनंतर इंग्रजांविरूद्ध देशभरात तीव्र लढा सुरू झाला होता. याच कालावधीत 1932 साली आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी ते शिक्षण घेत असलेल्या टिळक हायस्कूलमधील लिबांच्या झाडावर ‘तिरंगा’ फडकवला होता. त्यावेळी यशवंतराव चव्हाण हे इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत होते आणि ‘तिरंगा’ फडकावल्याबद्दल त्यांना 18 महिने कैद सुद्धा झाली होती.

देश पारतंत्र्यांच्या जोखडातून मुक्त व्हावा आणि भारत मातेच्या उद्धारासाठी आपण काही करावे, असे वाटणारे अनेक विद्यार्थी कराडमधील विविध शाळेत शिक्षण घेत होते. लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती चिंरतन जपल्या जाव्यात या उद्देशाने सन 1920 साली टिळक हायस्कूलची स्थापना झाली होती. याच शाळेतील कुमार लक्ष्मण गणेश जोशी व कुमार सदाशिव नारायण पेंढारकर यांनी 1930 च्या कायदेभंगाच्या चळवळीत सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांना झालेल्या शिक्षेची परिणती त्यांची जीवनज्योत विझण्यास झाली. एका अर्थाने ते दोघेही हुतात्मे झाले. लक्ष्मण जोशी यांना येरवडा जेलमध्ये न्युमिनिया झाला होता. शालेय जीवनात पहिला क्रंमाक पटकावणारा हा छोटा जवान क्रीडापटूही होता. तर सदुभाऊ पेंढारकर 1942 साली तुरूंगवासात असतानाच आजारी पडले होते. याच कालावधीत टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेणार्‍या स्व. यशवंतराव चव्हाण यांनीही स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेतला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीत शालेय विद्यार्थी असणारे यशवंतराव चव्हाण आघाडीवर होते. याच चळवळीत सहभाग घेतल्याबद्दल इंग्रजांकडून दंड ठोठावण्यात आला होता. 1932 साली इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणार्‍या यशवंतराव चव्हाण यांनी शाळेच्या आवारात असणार्‍या लिंबाच्या झाडावर ‘तिरंगा’ फडकावला होता. यशवंतराव चव्हाण यांनी इंग्रजांविरूद्ध पुकारलेल्या या लढ्याद्वारे शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली होती.

यशवंतराव चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना कैद झाली होती. शालेय जीवनात 18 महिन्यांची कैद होऊनही यशवंतराव चव्हाण हे आपल्या सहकार्‍यांसह देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत इंग्रजांविरूद्ध लढा देतच होते. यशवंतराव चव्हाण हे नावाप्रमाणेच ‘यशवंत’ झाले आणि त्यांनी ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या उक्तीप्रमाणे देशासह महाराष्ट्राच्या जडणघडणीत ऐतिहासिक कार्य केले.

स्वातंत्र्यलढ्यात तालुक्याचे योगदान

स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कराड तालुक्यातील शेकडो युवक सहभागी झाले होते. 24 ऑगस्ट 1942 साली स्व. दादासाहेब उंडाळकर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेवरून कराड तहसील कार्यालयावर मोर्चाही काढला होता. भारत छोडो अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली होती. आजही या मोर्चाच्या आठवणीसह स्वातंत्र्यसैनिकांच्या कामगिरीने कराडकरांना अभिमान वाटतो.

Back to top button