पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये आज (दि.३० ऑक्टोबर) टीम इंडियाचा पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकविरूध्द सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) झंझावाती खेळी करत एका विक्रमाला गवसणी घालण्याची संधी होती; परंतु, एग्निडीने त्याला १५ धावांवर बाद केले. या सामन्यात लवकर बाद झाल्यामुळे 'या' विक्रमाला गवसणी घालण्यासाठी रोहितला २ नोंव्हेंबरला होणाऱ्या बांग्लादेशविरूध्दच्या सामन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जाणून घेऊयात 'त्या' विक्रमाबद्दल…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) रोहित शर्माला (Rohit Sharma) ५०० षटकार ठोकणारा दुसरा खेळाडू बनण्याची मोठी संधी होती. त्याने द. आफ्रिकेविरूध्दच्या सामन्यात ५ षटकार लगावले असते तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० षटकार ठोकणारा दुसरा खेळाडू बनला असता. परंतु, आफ्रिकेच्या एग्निडीने त्याला सामन्याच्या पाचव्या षटकांत बाद केले.
रोहित सामन्यात एका षटकारसह १५ करून माघारी फिरला. या सामन्यात लवकर बाद झाल्यामुळे ५०० षटकार मारण्याच्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी पुढील सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तसेच पुढील सामन्यात चार षटकार मारत तो ५०० षटकारांचा टप्पा पार करू शकतो.
सध्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५३ षटकार लगावले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५३ षटकांसह ख्रिस गेल यादीत अव्वल स्थानी आहे. त्याच्या खालोखाल रोहित शर्मा ४९५ षटकारांसह यादीत दुसऱ्या स्थानी आहे. ४७६ षटकारांसह पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी तिसऱ्या स्थानी आहे. यादीच्या चौथ्या स्थानी ३९८ षटकांसह ब्रेंडन मॅक्युलमचा समावेश आहे. तर मार्टिन गप्टिल ३८३ षटकारांसह यादीत पाचव्या स्थानी आहे.
हेही वाचा;