पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) गेल्या काही काळापासून बॅटशी झुंजताना दिसत आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. मात्र, दोन्ही सामन्यांमध्ये डावखुरा फलंदाज ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. पंतच्या जागी अनुभवी दिनेश कार्तिकचा (Dinesh Kartik) संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, एका भारतीय चाहत्याने ऋषभला टीम इंडियासाठी सलामी दे, असा सल्ला दिला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गेल्या दोन सामन्यांवर नजर टाकली तर संघाचा सलामीवीर केएल राहुल फ्लॉप ठरत आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन त्याला विश्रांती देण्याचा विचार करत आहे. सलग दोन सामने जिंकल्यानंतर रोहित शर्मा अँड कंपनीचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला आहे. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी संघाच्या सलामीबद्दल खुलासा केला आहे. त्याचवेळी पर्थमध्ये ऋषभ पंतने (rishabh pant) सरावाच्या वेळी चाहत्यांसोबत सेल्फी घेतला आणि ऑटोग्राफही दिला. या दरम्यान, चाहत्याने त्याला तू टीम इंडियासाठी सलामीला ये असा सल्ला दिला. चाहत्याने ऋषभला म्हटले, 'भाई, ओपनिंग कर, टी इंडियाचे भारताचे नशीब बदलेल.'
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड म्हणाले, 'आम्ही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. चांगल्या हेतूने खेळणे हाच आमचा उद्देश आहे यात शंका नाही. आम्हाला जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. पण आपण ज्या परिस्थितीत खेळत आहोत ते लक्षात ठेवावे लागेल. याशिवाय खेळपट्ट्यांवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. मला वाटत नाही की येथील खेळपट्ट्यावर ह्या 200 किंवा 200 पेक्षा जास्त धावा होतील. त्यामुळे आपण मैत्रीपूर्ण असणे आवश्यक आहे. मला वाटते की या सर्व गोष्टी लक्षात घेऊन संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.'
टीम इंडिया विश्वचषकातील तिसरा सामना 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यातही टीम इंडियाने विजय मिळवला तर संघाचा उपांत्य फेरीचा मार्ग आणखी सुकर होईल. टीम इंडियाने विश्वचषकापूर्वी भारतात झालेल्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला होता.