खेड; अनुज जोशी : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा (Ratnagiri Kashedi Tunnel) शनिवारी (दि. २४) एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू होते. कोकणातील शिगमोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना कोकणात दाखल होण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa National Highway) बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून चाचणी घेऊन अखेर शनिवारपासून मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक ही कशेडी बोगद्यातून (Ratnagiri Kashedi Tunnel) वळवण्यात आली आहे. कशेडी बोगदा हा २ किलोमीटर लांबीचा असून या ठिकाणी ४० किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा वाहनांनी पाळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
कोकणातील शिमगोत्सव सणापूर्वी सरकारने कशेडी बोगदा (Ratnagiri Kashedi Tunnel) किमान एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याने कोकणवासीयांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीमध्ये बोगद्यातून वाहतूक मुंबईहून गोव्याच्या दिशेने एकेरी सुरू करण्यात आली होती. त्याचप्रकारे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. लहान वाहने प्रति तास ४० किलोमीटर वेगाने या बोगद्यातून रायगडमधून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होऊ लागली आहेत. लवकरच एसटी व खासगी आराम बस यांना देखील बोगद्यातून येण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत असून ती मार्च महिन्यात सरकार पूर्ण करणार का, याची उत्सुकता आहे.
कशेडी बोगद्यामधील अंतर्गत विद्युतीकरणाचे काम अद्याप प्रगतीपथावर आहे. दोन्ही बाजूचे जोड रस्ते पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मार्च अखेरपर्यंत ते पूर्ण करून दोन्हीही बोगदे वाहतुकीसाठी खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने कशेडी बोगदा केवळ मुंबई येथून गोव्याच्या दिशेला जाणाऱ्या लहान वाहनांसाठी खुला केला आहे. मात्र काही राजकीय कार्यकर्ते ठेकेदार व अधिकारी यांच्यावर दबाव आणून गोव्याहून मुंबईच्या दिशेला जाण्यासाठी हट्ट करत आहेत. परिणामी या बोगद्यातून दुहेरी वाहने ये-जा करताना अपघात होण्याची भीती असून त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा :