अयोध्या; वृत्तसंस्था : आज बुधवारी रामनवमी आहे. अयोध्येत दुपारी १२ वाजता रामलल्लाचा सूर्यतिलक विधी होईल. अभिजित मुहूर्तावर हा कार्यक्रम असून वाल्मीकी रामायणाप्रमाणे त्रेतायुगात याचवेळी व मुहूर्तावर प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता.
अयोध्येतील सूर्यतिलकप्रसंगी नऊ शुभ योग असून तीन ग्रहांची स्थिती त्रेतायुगात होती, तशीच यावेळीही असेल. दुपारी १२ वाजता सूर्यतिलक होईल तेव्हा केदार, गजकेसरी, पारिजात, अमला, शुभ, वाशी, सरल, काहल आणि रवियोग घडतील. या नऊ शुभ योगांत रामलल्लांचा सूर्यतिलक होईल. रामजन्मप्रसंगी सूर्य आणि शुक्र आपल्या उच्च राशीत होते; तर चंद्र स्वतःच्या राशीत उपस्थित होता. या वर्षीही योगायोगाने असेच घडत आहे. ग्रहांची ही दशा देशासाठी शुभ संकेत आहे, असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे.
सूर्यतिलक समारंभ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होईल. शिखरावर रिफ्लेक्टर यंत्रणा बसविण्यात आली असून त्याद्वारे सूर्याची किरणे प्रवास करतील व गर्भगृहात रामलल्लाच्या कपाळावर पडतील. सूर्यतिलक स्पष्टपणे दिसावा व रामलल्लालाही उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कपाळावर चंदनाचा लेप लावण्यात येणार आहे.
रामनवमीला रामलल्लांना पिवळा-गुलाबी रंगाचा स्वर्णजडित पोशाख परिधान केला जाईल. सोन्याच्या धाग्यांनी या पोशाखावर नक्षीकाम करण्यात आलेले आहे.
२० तास मंदिर खुले राहील. ब्रह्म मुहर्तावर पहाटे ३.३० वाजता मंगलारती होईल. यानंतर रात्री ११ पर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल.
श्रीराम जन्मानिमित्त पूजेची प्रदीर्घ परंपरा भारतात आहे. पूजेसाठी सकाळी ११.०५ ते दुपारी १.३५ वाजेपर्यंत असा जवळपास अडीच तासांचा मुहूर्त आहे.
हेही वाचा :