प्रभू श्री रामचंद्र : भारतीय लोकनायकाचे प्रतीक | पुढारी

प्रभू श्री रामचंद्र : भारतीय लोकनायकाचे प्रतीक

- प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

प्रभू श्री रामचंद्र यांच्याभोवती असलेले लोकनायकाचे तेजस्वी वलय आजही कायम आहे. श्री रामचंद्र यांच्याविषयीच्या लोककथा भारताच्या कानाकोपर्‍यात विखुरलेल्या आहेत. प्रभू श्री रामचंद्रांच्या सामाजिक, सांस्कृतिक कार्याचे लोकतत्त्वीय परंपरेने नवे आकलन करण्याची गरज आहे. आज रामनवमी. त्यानिमित्ताने…

भारतीय संस्कृतीमध्ये ज्या व्यक्तिमत्त्वाचा करिष्मा सदैव कायम राहिला आहे, त्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा समावेश अग्रक्रमाने होतो. रामचंद्रांना भारतीय परंपरेतील विष्णूच्या 10 अवतारांंपैकी सातवा अवतार मानण्यात येते. ‘विष्णुसहस्रनाम’मध्ये राम हे विष्णूचे 394 वे नाव असल्याचा संदर्भ सापडतो. काही अद्वैत वेदांतप्रेरित ग्रंथांमध्येही रामाचे परब—ह्माचे आधिभौतिक स्वरूप सूचित केले आहे. प्रत्येक प्राणिमात्रांत ज्याचा वास म्हणजे निवास असतो, जो रमण करतो त्याला ‘राम’ असे म्हटले जाते. म्हणजेच राम हा प्रत्येक प्राणिमात्राशी आणि मानव समूहाशी निगडित आहे. वनवासाच्या काळात रामचंद्रांना वनवासींनी खूप मदत केली होती. भारतात सुदूर पसरलेल्या डोंगराळ भागात वनवासींच्या आदर्श आणि अद्भुत शक्तीने भारतीय मूल्यांची प्रस्थापना करून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना लोकहृदयात अधिष्ठित केले. वाल्मीकींनी ‘रामायण’ लिहून प्रभू रामचंद्रांना साहित्याच्या दालनात अमर केले, तर तुलसीदासाने ‘रामचरित मानस’ हा ग्रंथ लिहून संपूर्ण हिंदी भाषक उत्तर भारतात प्रभू रामचंद्रांना मध्ययुगातही अजरामर केले. मराठीमध्ये संत एकनाथ यांच्या ‘भावार्थ रामायण’ने, तसेच ग. दि. माडगूळकरांनी रचलेल्या ‘गीतरामायण’ने अनेक पिढ्यांवर गारुड केले. दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तामिळनाडूसारख्या राज्यांतही ‘रामायणा’चा लोकजीवनावर प्रभाव दिसून येतो. हिंदूप्रमाणेच बौद्ध, जैन आणि शीख धर्मांमध्येही प्रभू रामचंद्रांचे श्रेष्ठत्व आणि पावित्र्य मान्य केले आहे. त्यामुळे श्रीरामाला राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.

पुराणकथांनुसार राम, कर्ण आणि शनी हे सूर्यकुळातील तीन वंशज मानले जातात. अभ्यासकांनी प्राचीन सांस्कृतिक इतिहासाची तुलनात्मक चिकित्सा करून प्रभू श्री रामचंद्र हे आदर्श व्यक्तिमत्त्व असल्याचे सिद्ध केले आहे. रामाचा जन्म कौसल्या व दशरथ यांच्या पोटी झाला. राजघराण्यात जन्म झाला असला तरी, रामाचे जीवन हे खडतर होते. प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीतीवर मात करून त्यांनी जीवनशिल्प कोरले. जेवढा संघर्ष अधिक असतो तेवढा वीरपुरुष तप्त मुशीतून तावून सुलाखून तेजस्वी सोन्यासारखा बाहेर पडतो. ‘रामायण’ ही दुष्ट प्रवृत्तीवर सुष्ट म्हणजे चांगल्या सद्गुणाने मिळविलेल्या विजयाची कथा आहे. संकटमोचक हनुमानाचे अद्भुत कार्य हाही ‘रामायणा’चा एक मोलाचा पैलू होय. कुशल नियोजन, उत्तम व्यवस्थापन आणि सामान्य दीनदलित आणि वनवासी यांच्या सामर्थ्यामुळे रामाला विजय मिळविता आला. त्यामुळे वनवासी हे पिढ्यान् पिढ्या रामकथा ऐकत आहेत, सांगत आहेत आणि एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हा अजोड सांस्कृतिक वारसा देत आहेत. रामाभोवती असलेले लोकनायक हे तेजस्वी वलय ‘राजा’माणूस नव्हे, तर ‘लोकनायक’ म्हणून आजही कायम आहे. रामाविषयीच्या लोककथा भारताच्या कानाकोपर्‍यात विखुरलेल्या आहेत. प्रभू श्री रामचंद्रांच्या सामाजिक, सांस्कृतिक कार्याचे लोकतत्त्वीय परंपरेने नवे आकलन करण्याची गरज आहे.

‘रामायण’ हे संस्कृत महाकाव्य लिहिणारे वाल्मीकी हे मराठवड्यातील परभणी जिल्ह्यातील वालूर या ऐतिहासिक नगरीत जन्मले, असे मानले जाते. वाल्मीकी ऋषींनी काही काळ चाळीसगावजवळ असलेल्या वालखेडा येथेही घालविला होता, अशी नोंद सापडते. ‘वाल्मीकी रामायण’ ही एक सोन्याची खाण आहे. अफाट प्रतिभाशक्तीचा हा महाकवी एखाद्या सोनचाफ्याप्रमाणे आजही सुगंध देत आहे. वाल्मीकींच्या मूल्यप्रेरणा आणि त्यांच्या कल्पकतेचे पाश्चात्त्य समीक्षकांनीसुद्धा कौतुक केले आहे.

‘राम’ या अर्थाचे अनेक संदर्भ प्राचीन वैदिक संस्कृत भाषेत आढळतात. काही वैदिक ग्रंथांनुसार रामाचा अर्थ आनंददायी, रमणीय, सुंदर, मोहक असा होतो. अन्य तमिळ व मल्याळी या भाषांतूनही रामाचे असेच वर्णन करण्यात आले आहे. ऋग्वेदातील 10 व्या अध्यायातील 110 श्लोकांचे लेखक राम जमदग्न ऋषी असल्याचे म्हटले आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन व शीख परंपरांतील अनेक कथा रामाचे सर्वसमावेशक रूप म्हणून प्रकट करतात. अंधाररात्रीवर मात करणारा, मनमोहक अनुभव प्रदान करणारा, सहज सुंदर चंद्रासारखा शीतल प्रकाश देणारा असा आदर्श पुरुष म्हणून राम अजरामर झाले आहेत.

शाश्वत आनंदी जीवन हा रामाचा संदेश आहे. ‘थांबा, स्थिर राहा, शांत व्हा. आनंदी जीवन जगा, प्रसन्न राहा,’ हा प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनाचा संदेश आहे. इतका निस्पृह, निर्मोही आहे राम.  सदाचरणी आहे राम. राम पराक्रमी आहे. बंधुप्रेमी आहे. एकवचनी आहे. राम प्रेमळ आहे, म्हणूनच तो आपला वाटतो. असा हा राम, कुणी म्हणेल त्याने हे सगळे केले कारण देव होता तो; पण तोच राम सांगतोय आपल्याला, ‘मी देव नाही. मी आहे माणूस! एक धर्माचरणी माणूस.  धर्माच्या नियमात राहून पराक्रम करायला निघालेला शूर पुरुष! गुणांचा आग्रह धरला तर तुम्हीही होऊ शकता माझ्यासारखे, गाजवू शकता पराक्रम आणि होऊ शकता राष्ट्राचे आदर्श, कुठल्याही युगात. त्यासाठी केवळ एक करा, माझ्या चरित्राचा अनुग्रह करा.’ प्रभू श्री रामचंद्र प्राचीन भारतातील लोकल्याणकारी राज्याचे उद्गाते होते. महात्मा गांधींनी त्यांच्या आदर्श राज्य कल्पनेस ‘रामराज्य’ असे नाव दिले आहे. पुढील 25 वर्षांत भारत पुन्हा एकदा जगामध्ये बलशाली व संपन्न राष्ट्र म्हणून तळपत राहील, असे जागतिक पतमानांकन संस्था सांगत आहेत. रामाच्या अभ्युदयाचे हे चैतन्यपर्व आहे.

Back to top button