पुढारी ऑनलाईन डेस्क : राम लल्लाला अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान करण्यात आल्यानंतर ही पहिली रामनवमी आहे. मर्यदा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचे जीवन आणि त्यांचे आदर्श विकसित भारताच्या उभारणीसाठी मजबूत आधार बनतील. त्यांच्या आशीर्वादाने आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामनवमीनिमित्त व्यक्त केला.
आज देशभरात रामनवमी साजरी होत आहे. यावेळी रामनवमीचा सण खूप खास आहे. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भगवान श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य मंदिरात रामनवमी साजरी होत आहे. येथे सूर्यवंशी स्वत: भगवान श्रीरामांच्या कपाळावर टिळक लावतील. दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी सूर्यकिरण प्रभू रामललाच्या कपाळावर पडतील, यासाठी महत्त्वाची तांत्रिक व्यवस्था करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांनीही ट्विट करून रामनवमीनिमित्त देशभवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहीले की, रामनवमीनिमित्त देशभरातील माझ्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. या शुभ प्रसंगी, माझे हृदय भावना आणि कृतज्ञतेने भरले आहे. श्रीरामाच्या परम कृपेने या वर्षी मी माझ्या लाखो देशवासीयांसह अयोध्येत प्राणप्रतिष्ठा पाहिली. अवधपुरीतील त्या क्षणाच्या आठवणी आजही माझ्या मनात त्याच उर्जेने स्पंदन करतात. ही पहिली रामनवमी आहे, जेव्हा आमचे राम लल्ला अयोध्येच्या भव्य आणि दिव्य राम मंदिरात विराजमान झाले आहेत. आज रामनवमीच्या या सणात अयोध्येत प्रचंड आनंद आहे. ५ शतकांच्या प्रतीक्षेनंतर आज अयोध्येत अशा प्रकारे रामनवमी साजरी करण्याचे भाग्य लाभले आहे. देशवासीयांच्या इतक्या वर्षांच्या कठोर तपश्चर्या, त्याग आणि बलिदानचे हे फळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भगवान श्रीराम भारतीय लोकांच्या हृदयात विराजमान आहेत. भव्य राम मंदिराच्या पहिल्या रामनवमीचा हा प्रसंग राम मंदिराच्या उभारणीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या असंख्य रामभक्तांना आणि संत-महात्मांना स्मरण आणि आदरांजली अर्पण करण्याचा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की मर्यदा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचे जीवन आणि त्यांचे आदर्श विकसित भारताच्या उभारणीसाठी मजबूत आधार बनतील. प्रभू श्री रामाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा :