पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या पहिल्याच निर्मितीद्वारे राजाभाऊ घुले यांनी दमदार असे पदार्पण केले आहे. त्यांच्या ओमकार फिल्म्स क्रिएशन द्वारे त्यांनी मराठीतील तगडी स्टारकास्ट आणि तंत्रज्ञांना घेऊन बिगबजेट अशा "अंकुश" चित्रपटाची निर्मिती केली आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटाला मोठ्या स्तरावर घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे. जानेवारी २०२३ मध्ये "अंकुश" हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले.
केवळ एकच चित्रपट न करता मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळे मनोरंजक चित्रपट निर्मिती करण्याचे त्यांचे ध्येय आहे. "अंकुश" चित्रपटात उत्तम असे साहस दृश्य पहिल्यांदाच मराठीत दिसणार आहेत. ही साहसदृश्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि के जी एफ चित्रपटाचे ॲक्शन डायरेक्टर विक्रम मोर यांनी. मराठीतील दिग्गज संगीतकार अमितराज आणि चिनार- महेश या सिनेमाचे संगीत करत आहेत. हिंदी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांनी या चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे. सुंदर अशी गीते मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर यांनी लिहिली आहेत.
नागराज दिवाकर यांचे छायांकन तसेच अनेक पुरस्कार प्राप्त संकलक निलेश गावंड यांनी या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शन गिरीश कोळपकर तर कार्यकारी निर्माता म्हणून विशाल चव्हाण यांनी काम पहिले आहे. या चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून पटकथा व संवाद निशांत नाथाराम धापसे आणि नामदेव मुरकुटे यांचे आहेत. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे लेखक सह दिग्दर्शक निशांत नाथाराम धापसे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.
"अंकुश" हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या काही दिवसात चित्रपटांच्या कलाकारांची सुद्धा घोषणा होईल असे निर्माते राजाभाऊ घुले आणि दिग्दर्शक निशांत नाथाराम धापसे यांनी सांगितले.
हेदेखील वाचा-