buffalo theft : नाशिकमध्ये चरण्यासाठी सोडलेल्या तीन म्हशींसह पारडू चोरीला | पुढारी

buffalo theft : नाशिकमध्ये चरण्यासाठी सोडलेल्या तीन म्हशींसह पारडू चोरीला

नाशिक, देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
चरण्यासाठी सोडलेल्या तीन म्हशींसह एक पारडू दोन संशयितांनी चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रघुनाथ त्र्यंबक कड (43, रा. मारुती गल्ली, लहवित) यांचा दुधाचा व्यवसाय आहे. ते गावातील मित्रांबरोबर नऊ म्हशी, सहा गायी, म्हशीचे तीन पारडू व एक हेला अशा एकूण 19 जनावरांना मल्हारी बाबानगरजवळील मिलिटरी एअरफोर्सच्या मोकळ्या रानात चारण्यासाठी घेऊन गेले होते. दरम्यान, ही जनावरे मोकळ्या रानात चरत असताना सायंकाळच्या सुमारास कड व त्यांचे मित्र एका झाडाखाली निवांत बसले होते. ही संधी साधून सुनील वाडेकर यांच्या मळ्यात कामासाठी असलेले गोट्या ऊर्फ नीलेश ज्ञानेश्वर काळे (32, रा. नानेगाव, ता. जि. नाशिक) व बालत्या ऊर्फ आकाश वाघ (35, रा. बार्न्स स्कूलजवळ) हे दोघे संशयित तेथे आले. त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन तीन म्हशी व एक पारडू अशी 1 लाख 60 हजार रुपये किमतीची जनावरे चोरून नेली. कड यांनी जनावरांची मोजणी केली, त्यावेळी तीन म्हशी व एक पारडू कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात जनावरे चोरीची फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित गोट्या काळे व आकाश वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगदाळे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button