धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंनी केलं योगी सरकारचं कौतुक

धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंनी केलं योगी सरकारचं कौतुक

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यावरून राजकारण अधिक तापले असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारचे कौतुक केले आहे. "उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार." असे राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे.

आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असे राज ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरून राजकीय वातावरण तापविले आहे. त्यांनी भोंग्याबाबत राज्य सरकारला ३ मे रोजीचा अल्टीमेटम दिला आहे. त्याचबरोबर ५ जून रोजी अयोध्या दौऱ्याचीही घोषणाही केली आहे. भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पीएफआय संघटनेने राज ठाकरे यांना धमकी दिली आहे.

दरम्यान, राज्यातील प्रगती पाहून विरोधकांना जळजळत आहे, मळमळत आहे. त्यामुळे ते राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करित आहेत. टीकेचे भोंगे वाजवणाऱ्यांना मी काडीचीही किंमत देत नाही, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.

तर भोंगा प्रकरणी केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर धोरण जाहीर करावे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केली होती. राज्य सरकार भोंग्याबाबत सध्या कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. ज्यांच्याकडून भोंग्यांचा वापर केला जात आहे त्यांनीच आता यावर विचार करायला हवा, असे वळसे-पाटील यांनी म्हटले होते.

logo
Pudhari News
pudhari.news