राज ठाकरेंच्या सभेच्या भोंग्याची ‘नसबंदी’ होणार ? पोलीसांकडून जमावबंदीचा आदेश लागू ! | पुढारी

राज ठाकरेंच्या सभेच्या भोंग्याची 'नसबंदी' होणार ? पोलीसांकडून जमावबंदीचा आदेश लागू !

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणार की नाही ? याबाबत अजूनही साशंकता आहे. राज ठाकरेंच्या सभेला अद्याप प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाही. दुसरीकडे पोलीसांनी सुद्धा आता जमावबंदीचा आदेश लागू केल्याने मनसेच्या गोटात चिंता पसरली आहे.

दुसरीकडे सभास्थळाबाबतही अनिश्चितता असताना मनसेने मात्र, त्याच सांस्कृतिक मैदानावर सोमवारी (दि.25) विधिवत पूजन करत थेट मंडप उभारणीने ’राजगर्जने’ची जोरदार तयारी सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठरल्यानुसार शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेण्याचे राज ठाकरेंनी जाहीर केल्यापासून राजकारण ढवळून निघत आहे. सभेमुळे सामाजिक शांतता बिघडू शकते. असे म्हणत विविध पक्ष, संघटनांकडून विरोध सुरू झाल्याने राजकीय वातावरण चांगेलच तापत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अजून सभेला परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे मनसेने मात्र, सभेची तयारी चालविली आहे.

ज्या मैदानावर सभेला परवानगी मिळेल की नाही, याबाबत अनिश्चितता असताना, त्याच मैदानावर रविवारी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्यासह जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर लगेचच मैदानावर व्यासपीठ, मंडप उभारणीच्या कामांनाही सुरुवात करण्यात आली आहे. सभेला अजून पाच दिवसांचा अवधी असून, प्रशासनाकडून परवानगी नक्‍कीच मिळेल. असा विेशास महानगर अध्यक्ष बिपिन नाईक यांनी व्यक्‍त केला.

राज ठाकरेंच्या सभेची सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. काही झाले तरी सभा 1 मे रोजी, सांस्कृतिक मंडळ मैदानावरच होईल, असे पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष खांबेकर यांनी ठणकावून सांगितले. सभापत्रिकेचे ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन सभेसाठी छापलेल्या विशेष निमंत्रण पत्रिकेचे नुकतेच मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज ठाकरेंनी सभेच्या तयारीचा आढावा घेत मनसेच्या जिल्हा पदाधिकार्‍यांचे कौतुक केले.

सभेला अद्याप परवानगी नाही मनसेच्या सभेला अद्याप परवानगी दिलेली नाही, याबाबत कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. असे पोलिस उपायुक्‍त अपर्णा गिते यांनी सांगितले.

हे ही वाचलं का ?

Back to top button