पुढारी ऑनलाईन : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये शनिवारी (दि.०८ जून) मुसळधार पावसाने हजेरी लावली. आजही (दि.९ जून) या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीर भारतीय हवामान विभागाने आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता (Rainfall in NW & Delhi ) वर्तवली आहे.
जम्मू काश्मीरमधील कठुआ आणि सांबा या जिल्ह्यात तसेच काही दक्षिणेकडील भागात देखील हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस उत्तर-पश्चिम भारतातील काही भागात जोरदार पाऊस सुरूच राहणार असल्याचे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले (Rainfall in NW & Delhi) आहे. उत्तर भारतात का पडतोय इतका पाऊस, काय आहे यामागील कारण जाणून घेऊया याविषयी….
उत्तर भारतात वारंवार वेस्टर्न डिस्टर्बन्सची स्थिती निर्माण होत असते. हेएक पश्चिमी वाऱ्यांमुळे निर्माण होणारे एकप्रकारचे वादळ असून, यामुळे मोठ्या प्रमाणात हवामान बदल होतात. हे वारे हिमालयाकडून आडवले जातात आणि यामुळे उत्तरेकडील या भागात पाऊस पडतो किंवा बर्फवृष्टी होते. दरम्यान भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स अर्थात पश्चिमी चक्रवात निर्माण झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. याचा प्रभाव असतानाच शनिवार (दि.८ जून) आणि रविवारी (दि.९ जून) रेकॉर्डब्रेक पाऊस पडला. पश्चिम चक्रावात आणि नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर पश्चिम भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. तसेच दिल्लीमध्ये देखील मुसळधार पावसाने ४० वर्षाचा पावसाचा रेकॉर्ड तोडला आहे.
दक्षिणेतील केरळ आणि कर्नाटक राज्यात देखील गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढचे काही दिवस केरळमधील कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. केरळमध्ये गेल्या एक आठवड्यांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आह. या मुसळधार पावसाने आत्तापर्यंत १९ जणांना मृत्यू झाला तर १० हजारांहून अधिक लोकांना फटका बसला आहे.