Santiniketan : टागोरांचे ‘शांतिनिकेतन’ आता जागतिक वारसा यादीत

Santiniketan : टागोरांचे ‘शांतिनिकेतन’ आता जागतिक वारसा यादीत

बीरभूम, वृत्तसंस्था : चार भिंतींआडच्या चाकोरीबद्ध शिक्षण पद्धतीमधून विद्यार्थ्यांचे बाल्य मुक्त करून ते निसर्गाच्या सान्निध्यात आणून कला, क्रीडा, संस्कृतीच्या माध्यमातून फुलवण्याचा अनोखा प्रयोग गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी शंभरपेक्षा अधिक वर्षांपूर्वी 'शांतिनिकेतन'च्या (Santiniketan) माध्यमातून सुरू केला होता. आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. आता 'युनेस्को'च्या जागतिक वारशांच्या यादीत (World Heritage List) पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात असलेल्या या 'शांतिनिकेतन'चा समावेश करण्यात आला आहे. सौदी अरेबियात रविवारी झालेल्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित बातम्या : 

पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

'शांतिनिकेतन'चा (Santiniketan) समावेश 'युनेस्को'च्या जागतिक वारशांच्या यादीत झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी म्हटले की, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या 'शांतिनिकेतन'चा समावेश जागतिक वारशांच्या यादीत झाल्याचा मला अतिशय आनंद आहे. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

'शांतिनिकेतन'चा प्रवास (Santiniketan)

* गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे वडील आणि ब्राह्मो समाजाचे एक अध्वर्यू देवेंद्रनाथ टागोर यांनी पश्चिम बंगालच्या बीरभूममधील रायपूरचे तालुकदार भुवन मोहन सिन्हा यांच्याकडून वार्षिक 5 रुपये भाड्याने बोलपूरजवळील 20 एकर जमीन कायमच्या भाडेपट्टीवर घेतली.
* देवेंद्रनाथांनी या जमिनीवर एक अतिथीगृह बांधून त्याला 'शांतिनिकेतन' नाव दिले.
* कालांतराने हा संपूर्ण परिसरच 'शांतिनिकेतन' म्हणून ओळखला जाऊ लागला.
* लंडनच्या हाईड पार्कमधील 'क्रिस्टल पॅलेस'च्या धर्तीवर त्यांनी ब्राह्मो समाजाच्या प्रार्थनेसाठी काचेचे सभागृह बांधले.
* रवींद्रनाथ टागोर यांनी 'शांतिनिकेतन'ला 27 जानेवारी 1878 मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी पहिली भेट दिली.
* सन 1888 मध्ये देवेंद्रनाथांनी संपूर्ण मालमत्ता ब्रह्मविद्यालयासाठी दिली.
* सन 1901 मध्ये रवींद्रनाथांनी तिथे 'ब्रह्मचर्याश्रम' सुरू केला, जो 1925 पासून 'पथ भवन' म्हणून ओळखला जाऊ लागला.
* सन 1921 मध्ये रवींद्रनाथांनी 'विश्वभारती विद्यापीठा'ची स्थापना केली. सन 1951 मध्ये तिला 'सेंट्रल युनिव्हर्सिटी' तसेच राष्ट्रीय महत्त्वाची संस्था घोषित करण्यात आले.
* 'शांतिनिकेतन'ला दरवर्षी दहा लाखांपेक्षा अधिक पर्यटक भेट देत असतात.
* सप्टेंबर 2023 मध्ये 'युनेस्को'च्या जागतिक वारशांच्या यादीत 'शांतिनिकेतन'चा समावेश.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news