जुने संसद भवन आजपासून इतिहासजमा! | पुढारी

जुने संसद भवन आजपासून इतिहासजमा!

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  देशाच्या ७५ वर्षांच्या संसदीय परंपरेचा अविभाज्य घटक राहिलेले जुने संसद भवन उद्या (१९ सप्टेंबर) इतिहास जमा होणार आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदीय कामकाज उद्या नव्या संसद भवनात स्थलांतरित होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी आज संसद भवन परिसरात पूर्ण करण्यात आली. तत्पूर्वी, विद्यमान १७ व्या लोकसभेतील सर्व खासदारांचे एकत्रित छायाचित्र उद्या जुन्या संसद भवनात काढले जाईल. त्यानंतर नव्या इमारतीत स्थलांतर होईल. त्यासाठी सर्व खासदारांना राज्यघटनेची प्रत देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी राज्यघटनेची प्रत सोबत घेऊन नव्या संसद भवनात प्रवेश करतील असे समजते.

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ७५ वर्षाच्या संसदीय परंपरेचा लेखाजोखा मांडणारी चर्चा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये झाली. यात कनिष्ठ सभागृह लोकसभेमध्ये लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यमान संसद भवनाला निरोप देताना त्यातील ऐतिहासिक स्मृतींना उजाळा दिला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील खासदारांनीही संसद भवनाशी असलेल्या भावनिक नात्याच्या आठवणी मांडल्या. यानंतर सांयकाळी सहाच्या सुमारास लोकसभेचे कामकाज उद्या दुपारी १.१५ मिनिटांपर्यंत तहकूब करण्यात आले. उद्यापासून लोकसभेचे कामकाज नव्या संसद भवनात सुरू होईल अशी औपचारिक घोषणा पिठासीन अधिकारी ओम बिर्ला यांनी केली. तर वरिष्ठ सभागृह राज्यसभेमध्ये देखील याच घटनाक्रमाची पुनरावृत्ती झाली असून सभापती जगदीप धनकड यांनी राज्यसभेचे कामकाज उद्या दुपारी सव्वादोनपर्यंत तहकूब करताना नव्या संसदेत नव्या कामाला सुरवात होणार असल्याचे जाहीर केले.

जुन्या संसद भवनाच्या मध्यवर्ती कक्षात (सेंट्रल हॉल) उद्या सकाळी साडेनऊच्या सुमारास लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार एकत्र येणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थलांतराआधी या मध्यवर्ती कक्षाजवळच्या भागात विद्यमान संसदेतील सर्व खासदारांचे एकत्रित फोटोसेशन होईल. त्याआधी मध्यवर्ती कक्षामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त धार्मिक विधी होणार असून सर्व खासदारांसाठी मेजवानी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर मिरवणुकीने दोन्ही सभागृहांचे पिठासीन अधिकारी तसेच पंतप्रधान मोदींसह सर्व खासदार नव्या संसद भवनात प्रवेश करतील. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभागृह नेते व केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसद भवनाच्या परिसरात या तयारीची आणि पंतप्रधानांच्या संभाव्य मिरवणूक मार्गाची पाहणी देखील केली

Back to top button