Parliament Special Session : आजपासून नवीन संसद भवनात कामकाज | पुढारी

Parliament Special Session : आजपासून नवीन संसद भवनात कामकाज

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या 75 वर्षांच्या संसदीय परंपरेचा अविभाज्य घटक राहिलेले जुने संसद भवन मंगळवारी (19 सप्टेंबर) इतिहासजमा होणार आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदीय कामकाज नव्या संसद भवनात स्थलांतरित होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी आज संसद भवन परिसरात पूर्ण करण्यात आली. तत्पूर्वी, विद्यमान 17 व्या लोकसभेतील सर्व खासदारांचे एकत्रित छायाचित्र उद्या जुन्या संसद भवनात काढले जाईल. त्यानंतर नव्या इमारतीत स्थलांतर होईल. त्यासाठी सर्व खासदारांना राज्यघटनेची प्रत देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी राज्यघटनेची प्रत सोबत घेऊन नव्या संसद भवनात प्रवेश करतील, असे समजते.

संबंधित बातम्या : 

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 75 वर्षांच्या संसदीय परंपरेचा लेखाजोखा मांडणारी चर्चा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये झाली. यात कनिष्ठ सभागृह लोकसभेमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यमान संसद भवनाला निरोप देताना त्यातील ऐतिहासिक स्मृतींना उजाळा दिला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील खासदारांनीही संसद भवनाशी असलेल्या भावनिक नात्याच्या आठवणी मांडल्या.

कामकाज तहकूब

सायंकाळी सहाच्या सुमारास लोकसभेचे कामकाज उद्या दुपारी एक वाजून 15 मिनिटांपर्यंत तहकूब करण्यात आले. उद्यापासून लोकसभेचे कामकाज नव्या संसद भवनात सुरू होईल, अशी औपचारिक घोषणा पीठासीन अधिकारी ओम बिर्ला यांनी केली; तर वरिष्ठ सभागृह राज्यसभेमध्येदेखील याच घटनाक्रमाची पुनरावृत्ती झाली असून, सभापती जगदीप धनकड यांनी राज्यसभेचे कामकाज उद्या
दुपारी सव्वादोनपर्यंत तहकूब करताना नव्या संसदेत नव्या कामाला सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले.

सकाळी होणार फोटोसेशन

जुन्या संसद भवनाच्या मध्यवर्ती कक्षात (सेंट्रल हॉल) उद्या सकाळी साडेनऊच्या सुमारास लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार एकत्र येणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थलांतराआधी या मध्यवर्ती कक्षाजवळच्या भागात विद्यमान संसदेतील सर्व खासदारांचे एकत्रित फोटोसेशन होईल.

मिरवणुकीने नव्या संसदेत

फोटोसेशनच्या आधी मध्यवर्ती कक्षामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त धार्मिक विधी होणार असून, सर्व खासदारांसाठी मेजवानी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर मिरवणुकीने दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी तसेच पंतप्रधान मोदींसह सर्व खासदार नव्या संसद भवनात प्रवेश करतील. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभागृह नेते व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसद भवनाच्या परिसरात या तयारीची आणि पंतप्रधानांच्या संभाव्य मिरवणूक मार्गाची पाहणीदेखील केली.

जुन्या संसदेची 95 वर्षे!

1. जुन्या संसदेत सोमवारी शेवटचे कामकाज झाले. 95 वर्षे याच इमारतीत कायदा निर्मात्यांनी देशाचे भाग्य लिहिणारे अनेक निर्णय घेतले. इंग्रजांच्या काळात 1927 मध्ये ही संसद तयार झाली होती. 144 स्तंभ या वास्तूत आहेत.

2. हार्बर्ट बेकर यांनी जुन्या संसदेची रचना डिझाईन केली होती. ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले होते.

3. उद्घाटनाच्या दोनच वर्षांनंतर 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांनी याच इमारतीत बॉम्बस्फोट केले होते.

4. 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण जगाच्या हृदयाला भिडेल, असे स्वतंत्र भारताचे पहिले भाषण केले.

5. याच इमारतीत लोकसभा अध्यक्ष जी. व्ही. मावळणकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली होती. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय प्रजासत्ताकाची घोषणा झाली.

6. युद्धकाळात लालबहादूर शास्त्रींनी देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी एकवेळ जेवण करण्याचे आवाहन देशवासीयांना केले होते.

7. इंदिरा गांधींनी बांगला देशला इथूनच स्वतंत्र केले. सिक्कीमच्या भारतातील विलयाची घोषणाही केली. 21 जुलै 1975 रोजी याच इमारतीतून आणीबाणी जाहीर झाली होती.

8. अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरणला अणुचाचणी घेतल्याची घोषणा केली.

9. 13 डिसेंबर 2001 रोजी दहशतवादी हल्ला झाला. 9 जण त्यात शहीद झाले.

10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काश्मीरमधील कलम 370 हटवले.

Back to top button