पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे हद्दीतील पहिल्या मेट्रो ट्रेनची (pune metro) शुक्रवारी आज (दि.३०) सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी पहिली ट्रायल रन घेण्यात आली. मेट्रोची ही ट्रायल रन कोथरूड येथील (हिल व्ह्यूव पार्क कारशेड) वनाज येथून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या आयडियल कॉलनीपर्यंत झाली. यावेळी उपस्थित पुणेकर मेट्रो (pune metro) धावण्याच्या पहिल्या टप्प्यातील मौल्यवान क्षणांचे साक्षीदार झाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
तसेच, मेट्रो कोचचे देखील यावेळी अनावरण झाले. याप्रसंगी मेट्रोच्या कामकाजाचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित, सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.
यावेळी अजित पवार यांनी मेट्रोच्या या विकास कामाला कधीही निधीचा तुटवडा भासू देणार नसल्याची ग्वाही दिली.
मेट्रो प्रकल्पाअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोची कामे प्रगतिपथावर आहेत.
यातील पिंपरी-चिंचवड ते दापोडी या मार्गावर मेट्रोची चाचणी एका वर्षांपूर्वी घेण्यात आली.
या मार्गाची ४ जुलै रोजी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीकडून पाहणी करण्यात आली.
मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची प्रक्रिया महामेट्रोकडून सुरू झाली आहे.
पुण्यातील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेअंतर्गत काही भागाची चाचणी ७ जुलै रोजी घेण्यात आली आहे.
त्यानंतर आता कोथरूड डेपो ते आयडियल कॉलनी या टप्प्याची आज चाचणी घेण्यात आली.