लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे बिगुल ! इच्छुकांची दावेदारी वाढली

File Photo
File Photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रशासकीय पातळीवर आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच आता राजकीय पक्षांतील दावेदारांचीही संख्या वाढत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दोन्ही गट सोडले, तर सर्वच प्रमुख पक्षांतील दावेदारांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या मार्च-एप्रिलमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे भाजप, काँग्रेससह इतर पक्षांनीही निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली. याच वेळी विविध राजकीय पक्षातील इच्छुकांकडून उमेदवारीसाठी दावेदारी सांगितली जात आहे.

खा. बापट यांच्या आकस्मिक निधनानंतर भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नवीन उमेदवार द्यावा लागणार आहे. या अनुषंगाने भाजपची उमेदवारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक व भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रस पक्षाकडून माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर यांनी तयारी सुरू केली होती. मात्र, आता यामध्ये माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचाही समावेश झाला आहे.

संबंधित बातम्या :

शिवरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपण काँग्रेस पक्षाकडून आगामी पुणे लोकसभा लढवण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. पाच दशकांचे काँग्रेस पक्षातील निष्ठेचे योगदान, नगरसेवक आमदार, महापौर, राज्यमंत्री आणि शहर काँग्रेस अध्यक्ष या पदांवर केलेले काम तसेच शहरातल्या सर्व घटकांशी असलेला घनिष्ठ संबंध या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर आपलाच खरा हक्क असल्याचा दावा शिवरकर यांनी केला आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि अजित पवार गटाकडून शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी लोकसभा उमेदवारीसाठी आपली दावेदारी जाहीर केली आहे. मनसेकडून महापालिकेतील माजी गटनेते वसंत मोरे आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. पुण्याची जागा भाजप व काँग्रेसच्या वाट्याला असल्याने महायुतीसोबत असलेल्या शिंदे गटाच्या आणि महाविकास आघाडीसोबत असलेल्या ठाकरे गटाच्या अशा दोन्हीही शिवसेनेने अद्यापतरी उमेदवारीबाबत कोणताही दावा केलेला नाही. एकंदरीत लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय पक्षातील इच्छुकांची दावेदारी वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला
देशात 2014 ला मोदी लाटेमध्ये काँग्रसचा बालेकिल्ला असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे खेचला. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे हे तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचेच उमेदवार गिरीश बापट हे सव्वातीन लाखांच्या फरकांनी विजयी झाले होते. त्यातच गेल्या दहा वर्षांत झालेल्या विविध निवडणुकांमध्ये पुणेकर मतदारांनी भाजपलाच पसंती दर्शविल्याने हा लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news