दसऱ्यासाठी राज्यभरातून पुण्यात अडीच लाख किलो झेंडू अन् दीड लाख किलो शेवंती

दसऱ्यासाठी राज्यभरातून पुण्यात अडीच लाख किलो झेंडू अन् दीड लाख किलो शेवंती

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या आश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात अडीच लाख किलो झेंडू आणि दीड लाख किलो शेवंतीची आवक होण्याचा अंदाज व्यापारीवर्गाकडून वर्तविण्यात येत आहे. रविवारी फुलबाजारात झेंडूच्या 12 ते 13 हजार क्रेट्स, 5 ते 6 हजार गोण्या व शिवनेरी रस्त्यावर 30 ते 35 हजार क्रेट्स झेंडूची व 30 ते 40 हजार किलो शेवंतीची आवक झाली. घाऊक बाजारात झेंडूला किलोला 10 ते 40 रुपये, तर शेवंतीला 80 ते 200 रुपये दर मिळाला.
दसर्‍याच्या दिवशी पूजेसह हार, तोरणासाठी लागणार्‍या झेंडूच्या फुलांना दर वर्षी मोठी मागणी राहते.

त्यानुषंगाने रविवारपासूनच बाजारात झेडूंची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचे सांगून फुलविभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे म्हणाले, की बाजारात जिल्ह्यासह सोलापूर, कोल्हापूर, सातारा, तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशीव येथून मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक होत आहे. यामध्ये, नारंगी, पिवळा, कलकत्ता, तुळजापुरी, कापरी आदी झेंडूंच्या फुलांचा समावेश आहे. घाऊक बाजारात त्याच्या प्रतिकिलोस 10 ते 40 रुपये भाव मिळत आहे. झेंडूच्या फुलांसह अन्य सर्वच फुलांना चांगली मागणी आहे. दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी रविवारपासून जिल्ह्यासह परराज्यातील खरेदीदारांनी मोठी गर्दी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारातील आवकही वाढली असून, दर काही प्रमाणात कमी असल्याचे कोंडे यांनी नमूद केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news