Dasara special : यंदा सीमोल्लंघन दणक्यात ! वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन | पुढारी

Dasara special : यंदा सीमोल्लंघन दणक्यात ! वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : कोणी झेंडूच्या फुलांच्या खरेदीत, तर कोणी आपट्याच्या पानांच्या खरेदीत व्यग्र होते… कोणी फुलांचे तोरण खरेदी करीत होते, तर कोणी सराफाच्या दालनांमध्ये सोने खरेदी करताना दिसले… रविवारी (दि. 22) बाजारपेठांमध्ये असे वातावरण पाहायला मिळाले. सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी खरेदीचे निमित्त साधले. विजयादशमी म्हणजेच दसर्‍यानिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. तर, मंदिरांमध्ये आणि घरोघरीही जोमाने तयारीला सुरुवात झाली आहे. मोठ्या उत्साहात, आनंदात दसरा साजरा केला जाणार असून, यानिमित्ताने सगळीकडे उत्साहाची लहर पाहायला मिळत आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा मंगळवारी (दि.24) उत्साहात साजरा होणार आहे. दसर्‍याच्या तयारीची लगबग सध्या सगळीकडे दिसून येत आहे. रविवारीही (दि.22) खरेदीचा उत्साह बाजारपेठांमध्ये पाहायला मिळाला. मंडई, रविवार पेठ, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, डेक्कन परिसर, कॅम्प परिसर आदी ठिकाणी खरेदीसाठी दालनांमध्ये लगबग दिसून आली, लोकांमध्ये खरेदीचा आनंद पाहायला मिळाला आणि पूजेच्या साहित्यांपासून ते फुलांच्या खरेदीपर्यंत…फुलांच्या तोरणापासून ते आपट्याच्या पानांपर्यंतच्या खरेदीचे निमित्त पुणेकरांनी साधले. मध्यवर्ती पेठांसह फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता येथील इलेक्ट्रॉनिक साहित्याची दालनेही गर्दीने फुलून गेली होती. सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, नवीन वाहन खरेदीच्या शोरूममध्ये बुकिंगसाठी लगबग दिसली.

तर, सायंकाळी मंडई, रविवार पेठ, तुळशीबाग, लक्ष्मी रस्त्यावर पूजेच्या साहित्यासह झेंडूची फुले, आंब्याची पाने आणि आपट्याच्या पानांच्या खरेदीसाठी लगबग पाहायला मिळाली. दसर्‍याच्या निमित्ताने अनेकांनी नवीन वस्तूंचे बुकिंगही केले. दसर्‍याच्या निमित्ताने नवीन कपड्यांची खरेदीही अनेकांनी केली. बाजारपेठांमध्ये रविवार हा सुटीचा दिवस असल्याने खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. जोडीला घरोघरीही दसर्‍याची तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. फुलांचे तोरण आणि सजावट करण्यासह लोक पूजेच्या साहित्यांची जुळवाजुळव करण्यात व्यग्र असल्याचे पाहायला मिळाले. घरोघरी फुलांचे तोरण, विद्युत रोषणाई आणि पूजेसाठीची तयारीही अंतिम टप्प्यात आली असून, मंदिरांमध्ये धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि सीमोल्लंघनाच्या मिरवणुकीची तयारी करताना पदाधिकारी-कार्यकर्ते दिसून आले. ठिकठिकाणी रावण दहनाच्या कार्यक्रमाचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दसरा यंदा दणक्यात साजरा केला जाणार असून, त्याच्या तयारीची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे.

Back to top button