Pune News : खासगी रुग्णालयांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ | पुढारी

Pune News : खासगी रुग्णालयांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. विशेषत: खासगी रुग्णालयांमध्ये लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये डेंग्यूचे मोठ्या प्रमाणात निदान होत आहे. रुग्णालयात अ‍ॅडमिट होणार्‍यांमध्येही सुमारे 30-40 टक्के रुग्ण डेंग्यूचे असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. अंगदुखी, थकवा, अशक्तपणा अशी लक्षणे जाणवत असल्याने डॉक्टरांकडे येणा-या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. तीन ते पाच दिवसांहून अधिक काळ लक्षणे कायम राहिल्यास रक्ताची तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला जनरल फिजिशियन डॉ. अनिकेत देशपांडे यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या : 

रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास रुग्णांना अ‍ॅडमिट करण्यास सांगितले जाते. औषधोपचार पूर्ण होऊन डिस्चार्ज दिल्यानंतरही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये बरे होण्यासाठी जास्त कालावधी लागत आहे. ऑक्टोबर महिन्यातील वातावरणातील आर्द्रता आणि उष्णतेमुळे डासांसाठी आदर्श प्रजनन स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून डेंग्यूच्या संसर्गांमध्ये निश्चित वाढ झाली आहे. त्यासोबतच फ्लूचे रुग्णही वाढत आहेत. डेंग्यूच्या संसर्गामुळे बालरोग विभागातील रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण 10-20 वर्षे वयोगटातील आहेत.
                                                  – डॉ. अनिता साळुंखे, जनरल फिजिशियन

Back to top button