कवच कितीही आधुनिक असले तरी युध्दावेळी शस्त्र खाली ठेवले जाऊ शकत नाही, असे उदाहरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (pm modi address to nation) शुक्रवारी कोरोनाच्या संदर्भात नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले.
देशाने नुकताच शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते. जसे चप्पल घालून बाहेर जायची सवय लागली आहे, तसे मास्क घालूनच बाहेर जायची सवय लावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
अतिशय कमी काळात शंभर कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, त्याबद्दल देशवासिय अभिनंदनास पात्र आहेत. मात्र सणासुदीच्या काळात आपणास जास्त जागरुक राहण्याची गरज आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, जोपर्यंत युध्द सुरु असते, तोवर शस्त्र खाली ठेवले जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत कोरोना आहे, तोवर बचावाचे उपाय आपण अंमलात आणले पाहिजेत. कवच कितीही आधुनिक असले तरी युध्दावेळी शस्त्र खाली ठेवले जाऊ शकत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
भारतासारखा देश कोरोनाविरोधात कसा लढणार, अशी शंका सुरुवातीला अनेकांनी घेतली. इतका संयम आणि शिस्त कुठून येणार, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले. मात्र आमच्यासाठी लोकशाहीचा अर्थ सर्वांची साथ…हा आहे. त्याचसाठी मोफत लस देण्याची मोहिम सुरु करण्यात आली. आजार ज्याप्रमाणे भेदभाव करीत नाही, त्याप्रमाणे लसीकरण करताना कुठेही भेदभाव करण्यात आला नाही. लसीकरण मोहिमेत व्हीआयपी संस्कृतीचा फाटा देण्यात आला. कोणी कितीही मोठ्या पदावर असला तरी सर्वसामान्य नागरिकांना लवकरात लवकर लस कशी मिळेल, हे निश्चित करण्यात आले.
शंभर कोटी लोकांना डोस देणे हा केवळ एक आकडा नाही तर ती नव्या पर्वाची सुरुवात आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, गेल्या वर्षीच्या दिवाळीवेळी कोरोनाच्या संदर्भात लोकांच्या मनात एक प्रकारचा तणाव होता. पण आता शंभर कोटी लोकांचे लसीकरण झाल्यामुळे मनात विश्वास निर्माण झाला आहे. भारताच्या को-विन प्लॅटफॉर्मने जी व्यवस्था तयार केली आहे, त्याचे सार्या जगाला आकर्षण आहे. को-विन प्लॅटफॉर्ममुळे केवळ लोकांची सोय झालेली आहे, असे नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे काम सोपे केले आहे. भारताचा संपूर्ण लसीकरण कार्यक्रम विज्ञानाच्या गर्भातून जन्मलेला आहे. हा कार्यक्रम म्हणजे सायन्स बॉर्न, सायन्स ड्रायव्हन आणि सायन्स बेस्ड आहे.
यापूर्वीच्या काळात मेड इन.. हा देश…, मेड इन.. तो देश…असा बोलबाला होता. पण आता मेड इन इंडियाची ताकत वाढत आहे. छोट्यातली छोटी वस्तू का असेना, ती मेड इन इंडियाच लोकांनी खरेदी करावी. भारतात बनलेली वस्तू खरेदी करणे म्हणजे वोकल फॉर लोकल…ला प्रत्यक्ष वास्तवात उतरवणे होय. सर्व लोकांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले.
देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे, असे सांगून ते म्हणाले की, अर्थतज्ज्ञ आणि देशी-विदेशी अर्थसंस्था भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत खूप सकारात्मक आहेत. भारतीय कंपन्यांमध्ये सध्या विक्रमी प्रमाणात गुंतवणूक होत आहे. यामुळे युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. स्टार्ट अप्स, युनिकॉर्न क्षेत्र विस्तारत आहे. जसे स्वच्छ भारत अभियान हे एक जनआंदोलन आहे, तसे भारतीय वस्तू खरेदी करणे हे जनआंदोलन बनले पाहिजे. कोरोना संकटकाळात आपल्या कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला मोठी मजबुती प्रदान केली होती. सध्या विक्रमी प्रमाणात धान्याची खरेदी केली जात आहे आणि त्याचे पैसे थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जात आहेत. लसीकरणाचे प्रमाण जसे वाढत आहे, तसे प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक वाढत आहे.
हे ही वाचलं का?