पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
वादळी वाऱ्यामुळे लिंबाचे झाड कोसळून झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.10) दुपारी तीनच्या सुमारास पिंपळनेर-नवापूर रोडवर घडली. वैभव वसंत दशपुते (३७,रा. विद्यानगर,पिंपळनेर) असे मयत शिक्षकाचे नाव आहे.
वैभव दशपुते व अहमद शेख महंमद पठाण (४८, रा.रोशननगर,पिंपळनेर) हे दोघे दुचाकीने (क्र.एमएच १८-०) पिंपळनेरकडून सामोडेकडे जात होते. त्याचवेळी वादळी वारा सुरू झाला. पिंपळनेर-नवापूर रस्ता बनविण्यासाठी काम सुरू असून या रस्त्यावरुन जात असताना वादळी वाऱ्यामुळे पिंपळनेर-नवापूर रस्त्यालगत असलेले लिंबाचे झाड दशपुते यांच्या दुचाकीवर कोसळले. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण झाडाखाली दबले गेले. घटनास्थळी काही तरुणांनी तातडीने मदतकार्य सुरू करून दोघा जखमींना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैभव दशपुते यांना मृत घोषित केले. तर जखमी अहमद शेख महंमद पठाण यांना प्राथमिक उपचार करून धुळे येथे पुढील उपचारासाठी पाठवले. रस्त्यावर झाड पडल्याने, बराच काळ वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. वैभव हे सेवानिवृत्त शिक्षक वसंत दशपुते यांचा एकुलता एक मुलगा असून गावातील कै. एन. एस. पी. पाटील विद्यालयात शिक्षक म्हणून सेवेत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्यावर सकाळी १० वाजता रोशननगर, पिंपळनेर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.