दिलेले आश्वासन पाळणाऱ्या नेत्यावरच जनतेचा विश्वास : नितीन गडकरी

नितीन गडकरी, धुळे www.pudhari.news
नितीन गडकरी, धुळे www.pudhari.news
Published on
Updated on

धुळे पुढारी वृत्तसेवा : राजकारणात खोटे आश्वासन देऊन जनतेला मूर्ख बनवू शकत नाही. खोटे स्वप्न दाखवल्याने जनतेचे तात्पुरते प्रेम असते. त्यामुळे आश्वासने ही नेहमी पूर्ण केली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले.

धुळे येथे विविध योजनांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन झाले होते. यावेळी त्यांच्या समवेत धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे, नंदुरबारच्या खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, आमदार कुणाल पाटील, आमदार गिरीश महाजन, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, महापौर प्रदीप करपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, भारतीय जनता पार्टीचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, ओम खंडेलवाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी आठ योजनांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे दोन्ही खासदार आणि आमदारांनी नितीन गडकरींचे आभार मानत अनेक रस्त्यांची कामे सुचवली ही सर्व कामे मंजूर करत असल्याचे नितीन गडकरी यांनी मंचावरून जाहीर केले.

यावेळी बोलतांना मंत्री गडकरी म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी पाणी, वीज, संपर्क आणि रस्ते या चारही गोष्टींची गरज आहे. या चारही गोष्टी उपलब्ध झाल्यानंतर उद्योग व व्यापार वाढतो. त्याचप्रमाणे त्या जिल्ह्यात गुंतवणूक आल्याने रोजगार वाढतो. परिणामी लोकांची गरिबी दूर होते. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील गरिबी दूर व्हावी आणि या भागातील जनता स्वाभिमानी व्हावी, यासाठी रस्ते विकासाबरोबरच अनेक विकासाची कामे करण्यात येते आहे. धुळे जिल्हा टंचाईसाठी प्रसिद्ध आहे. पण आज विमानातून पाहिले असता या जिल्ह्यात असलेले तलाव पाहून समाधान वाटते. आपण बुलढाणा, लातूर या भागात जलसंधारणाची मोठी योजना राबवली. यातून दोन तलाव बांधले. या तलावाच्या माध्यमातून दोन हजार हेक्टर जमिनीवर सिंचन झाले. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे आमदार अमरिशभाई पटेल यांनी राबवलेल्या जलसंधारण योजनेचे आपण लोकसभेत स्तुती केली. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपण या योजनेच्या दखल घेण्याची विनंती केली होती. असे गडकरी यावेळी म्हणाले.

पावसाच्या माध्यमातून मिळणारे धावणारे पाणी हे जमिनीमध्ये जिरवले पाहिजे. गावातले पाणी गावात आणि शेतातले पाणी शेतात राहिल्यास शेतीला त्याचा फायदा होऊन शेतकऱ्याचा विकास होऊ शकतो. त्यामुळे आता आपण रस्ते बांधताना नदी-नाले खोल करून तलावाची माती रस्त्यात वापरन्यास परवानगी देणारा आदेश काढला आहे. या आदेशाचा फायदा घेवून जल सिंचनाची क्रांती केली पाहिजे. अजिंठा बुलढाणा परिसरात आपण अशाच पद्धतीने काम केले. त्यामुळे पंधरा ते वीस हजार धनगरांचे स्थलांतर बंद झाले. या भागातील दुष्काळ संपला. रस्ते बांधत असताना आपण या संदर्भात काढलेल्या आदेशाचा उपयोग धुळे आणि नंदुरबार येथील लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. या भागात रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्याने आता नॅशनल हायवे कडून तलाव, नदी-नाले खोल करून घेतली पाहिजे. तसेच कोणताही खर्च न करता तलाव बांधून घेतले पाहिजे. पुलाजवळच्या जमिनीवर ब्रिज कम बंधारा बांधल्यास त्याचा देखील उपयोग होऊ शकतो असे गडकरी यांनी सांगितले.

वडोदरा ते जळगाव या महामार्गाचे काम लोकप्रतिनिधींनी आज सुचवले. त्यामुळे आपण या विभागाचा या मार्गाचा अभ्यास करण्याचे सुचवले आहे. नव्याने होणाऱ्या रस्ते विकासाच्या कार्यक्रमांमध्ये आपण आता पुरुष आणि महिलांसाठी चांगल्या दर्जाचे स्वच्छतालय तयार करणार आहोत. विशेषता लहान बालकांना दूध पाजण्यासाठी विशेष खोल्यांची व्यवस्था करतो आहोत. मात्र हे सर्व करत असतांना जनतेने देखील या वास्तुची स्वच्छता राखली पाहिजे, असेही ते म्हणाले

नाशिकच्या खासदार तथा केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी विनंती केल्यामुळे आपण नाशिक ड्रायपोर्ट तयार करत आहोत. या धर्तीवर राज्याने जागा दिल्यास आपण धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात लॉजिस्टिक पार्क तयार करून देऊ शकतो. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील खासदारांनी सरकारी जागेचा शोध घेऊन राज्य शासनाचे नाहरकत आणल्यास या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी आपण लॉजिस्टिक पार्कसाठी खर्च करण्यास तयार असल्याचे, ना. गडकरी यांनी सांगितले.

यावेळी मंचावर टोलनाक्याच्या संदर्भात भाजपाचे संजय शर्मा यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना गडकरी यांनी सांगितले की, आता देशभरातील नाके जीपीएस यंत्राच्या माध्यमातून चालवले जाणार आहे. त्यामुळे वाहने प्रवास करतील तेवढाच टोल त्यांना द्यावा लागणार आहे. यानंतर होणाऱ्या नवीन टोलनाक्यांवर ही व्यवस्था कार्यान्वित होईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचा उल्लेख करत असताना गडकरी यांनी सांगितले की, हा रेल्वे मार्ग करण्यासाठी तत्कालीन आमदार अनिल गोटे आणि खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला. त्यामुळे आपण जेएनपीटीच्या माध्यमातून हा रेल्वेमार्ग मार्गी लावण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यामुळे या रेल्वे मार्गाचे आश्वासन पाळले गेल्याचे त्यांनी सांगितले. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील महामार्गाचे विस्तारीकरण करणारे यापूर्वीचे ठेकेदार दिवाळखोरीत गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आता नव्याने काम सुरू झाले असून हा प्रश्न मार्गी लागणार आहे. पण या भागामध्ये येणारा कॉन्ट्रॅक्टर दिवाळखोरीत का जातो असे सांगत त्यांनी टोला देखील लगावला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news